

पुढारी ऑनलाइन डेस्क | मालेगाव व्होट जिहाद प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून किरीट सोमय्या यांच्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास ATS कडे देण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. मालेगाव व्होट जिहाद फडिंग घोटाळ्याचा तपास ATS महाराष्ट्र पोलिसांकडे हस्तांतरित केल्याबद्दल सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे पैसे 'व्होट जिहाद'साठी वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
सिराज मोहम्मद, नागनी अक्रम मोहम्मद, वसीम वली मोहम्मद, शेख शाहबाज , जाफरभाई नाबिवाला अलशेहजाद, आमिर वधारिया, अब्दुल क्वादिर भागड हे मेहमूद भगाड याचे साथीदार असून ते या घोटाळ्यात सहभागी आहे. मेहमूद भागड या टोळीचा प्रमुख असून या घोटाळ्यातील एक हजार कोटी रुपयांपैकी 600 कोटींहुन अधिक दुबईला पाठविण्यात आले. निवडणुकांच्या काळात 100 कोटी रुपये व्होट जिहादसाठी वापरण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
मेहमूद भागड यांना सुमारे 1000 कोटी मिळाले आणि मुंबई, नाशिक, अहमदाबाद, सुरत येथील हवाला ऑपरेटर्सना हस्तांतरित करण्यात आले. त्यातील 600 कोटींहून अधिक दुबईला हस्तांतरित करण्यात आले. मेहमूद भागड हा या टोळीचा एक प्रमुख असल्याचे समजते. अशा अनेक टोळ्या या घोटाळ्यात सक्रीय असून व्होट जिहाद मोहिमेसाठी वरीलपैकी 100 कोटी रोख स्वरूपात काढले आणि ऑक्टोबर 2024 मध्ये (मालेगावमार्गे) विविध संघटना, नेत्यांना वितरित करण्यात आले. तसेच या सिंडिकेट्स/गँग्सचा वापर दहशतवादी फंडिंग, ड्रग माफिया, व्होट जिहाद प्रकारच्या हालचालींसह पैशाच्या व्यवहारांसाठी केला जात असल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा सविस्तर तपास व्हावा यासाठी इडी, एनएआय, सीबीआय, इनकम टॅक्स, एफआययू, जीएसटी, सीजीएसटी या प्रमुख यंत्रणांशी समन्यवय साधण्यास, मदत घेण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना विनंती करावी अशी विनंती सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे.