

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
दि. १९ फेब्रुवारीपासून प्रारंभ झालेल्या रमजान पर्व अंतिम टप्प्यात असल्याने मुस्लीम बांधवांमध्ये रमजान ईदची उत्सुकता वाढीस लागली आहे. अवघ्या तीन, चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या ईदला तयार केल्या जाणाऱ्या शिरखुर्मासाठी लागणाऱ्या सुकामेवा व शेवईच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे.
किदवाईरोड, मोहंमद अली रोड, कुसुंबा रोड, फतेह मैदान आदी ठिकठिकाणी सुकामेवा, शेवई विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत. यंदा सुकामेव्याच्या दरात झालेल्या वाढीचा फटका बसत असल्याने आर्थिक नियोजन कोलमडत असले, तरी सुकामेवा व शेवईची खरेदी केली जात आहे.
शिरखुर्मासाठी लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने व्यापाऱ्यांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे. सायंकाळी रोजा सुटल्यानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी महिलांसह मुस्लीम बांधवांची एकच झुंबड उडत असून, मध्यरात्री उशिरापर्यंत ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ अक्षरशः फुलून जात आहे.
रमजान ईदला शिरखुर्मा हे मिष्टान्न तयार करण्यात येवून कुटुंब नातेवाइकांसह हितसंबंधितांना बोलावून खाऊ घालण्याची परंपरा मुस्लीम बांधवांतर्फे जपली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिरखुर्मासाठी लागणाऱ्या सुकामेवासह शेवई आदी वस्तूंची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आलेली आहेत.
रमजान पर्व अंतिम टप्प्यात आल्याने मुस्लीम बांधवांतर्फे विशेषतः महिलांतर्फे शिरखुर्माचे साहित्य खरेदीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यंदा बदाम, काजू, चार मगज हजार रुपये किलो, तर खोबरे ३८० रुपये, खजूर २८० रुपये, पिस्ता दोन हजार रुपये किलो, मनुका ३२० रुपये किलोने विकले जात आहे.
चारोळी मात्र यंदा ३ हजार रुपये किलोने विकली जात आहे. इतर सुकामेव्यात विशेषतः खोबऱ्यासह चारोळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. शेवईच्या दरातदेखील यंदा वाढ झाली आहे. शिरखुर्मा तयार करण्यासाठी शेवई-सुत्तरफेणी आवश्यक घटक आहे. मात्र तूप, मैदा व मजुरीच्या दरात वाढ झाली तरी गतवर्षी १६० रुपये किलो विकली जाणारी सुत्तरफेणी आजही १६० रुपये दरानेच विकली जात आहे.
मात्र, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने पुढे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिरखुर्मा प्रत्येकाच्या घरात तयार केला जाणार आहे. यामुळे या साहित्याची गरीव असो श्रीमंत सर्वच जण आपल्या आर्थिक नियोजनाप्रमाणे खरेदी करत असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुकामेवा व इतर साहित्यासाठी बाजारपेठेत होणार असल्याने व्यापारी वर्गास मोठा दिलासा मिळाला आहे.