

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील अर्थचक्राला गती देणाऱ्या पॉवरलूम उद्योगातील 'खटखट'चा आवाज बुधवार (दि. ७) पासून तब्बल सात दिवस थांबणार आहे. सुताच्या वाढलेल्या दरांच्या तुलनेत कापडाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च आणि विक्रीदरातील तफावत वाढली आहे. परिणामी, वाढता तोटा रोखण्यासाठी पॉवरलूम उद्योगाने सात दिवसांचा ऐतिहासिक शटडाऊन पुकारला आहे.
येथील वस्त्रोद्योगाला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यार्नच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना, तयार कापडाच्या दरात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे विणकरांच्या उत्पादन खर्चावर मोठा परिणाम झाला असून, प्रत्येक मीटरमागे सुमारे तीन रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा उद्योग क्षेत्रातून करण्यात येत आहे.
विशेषतः पाली आणि बालोतरा येथील कापड बाजारातील परिस्थितीचा मालेगावच्या पावरलूम उद्योगावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. तेथील बाजारपेठेत कापडाच्या दरात मोठी घसरण झाल्याने मालेगावतील उत्पादकांसमोर कापड विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे महागडे सूत खरेदी करायचे आणि दुसरीकडे कमी दरात कापड विकायचे, अशा दुहेरी कात्रीत विणकर सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर उत्पादन सुरू ठेवण्यापेक्षा काही काळ यंत्रमाग बंद ठेवणेच आर्थिकदृष्ट्या परवडणारे ठरत असल्याची भावना उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यामुळे आजपासून सुरू झालेला आठ दिवसांचा बंद हा केवळ पॉवरलूम उद्योगापुरता मर्यादित नसून, त्याचा परिणाम सूत व्यापारी, कापड व्यापारी, हमाल, वाहतूकदार आणि संबंधित लघुउद्योगांवरही होण्याची शक्यता आहे.
अर्थव्यवस्थेवर परिणाम:
शहराच्या हजारो कुटुंबांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार पॉवरलूम उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे कापड उद्योगातील ही अस्थिरता कायम राहिल्यास शहराच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा व्यापक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने यार्नचे दर, कापडाचे बाजारभाव आणि विणकरांना होत असलेला प्रतिमीटर तोटा याचा तातडीने आढावा घेऊन उद्योगाला दिलासा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.