

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरासह परिसरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत ११ चोरीच्या दुचाकींसह सुमारे ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विधिसंघर्षित बालकासह चोरीच्या गाड्यांची खरेदी-विक्री करणारा शोएब अन्सारी उर्फ पाप्या चोरवाला अटक करण्यात आली, तर शहजाद अहमद शकील अहमद उर्फ शहजाद गुजी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांच्या निर्देशांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालेगावातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते. दरम्यान, मोसम पूल परिसरातील बसस्टॉपजवळ एक संशयित हा विनानंबर चोरीची दुचाकी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील हिरो एचएफ डिलक्स दुचाकीबाबत विचारणा केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
मात्र विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने व त्याचा साथीदार शहजाद गुजी यांनी टेहरे (ता. मालेगाव) येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत मालेगाव शहर व ग्रामीण भागातून एकूण ११ दुचाकी चोरी केल्याचे समोर आले. या गाड्या विक्रीसाठी शोएब अन्सारी फय्याज अहमद उर्फ पाप्या चोरवा (३१, रा. जाफरनगर, मोहम्मद अली रोड, मालेगाव) याच्याकडे दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ११ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये तीन हिरो एचएफ डिलक्स, तीन होंडा युनिकॉर्न, दोन होंडा शाइन, एक होंडा अॅक्टिव्हा, एक यामाहा एफझेड आणि एक हिरो सीडी डॉन यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे मालेगाव छावणी व पवारवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी शोएब अन्सारी हा चोरीच्या गाड्या कमी दरात विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याला मालेगाव छावणी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतर्गत अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे, हवालदार चेतन संवत्सरकर, सुभाष चोपडा, सचिन वराडे, अंमलदार दत्ता माळी यांच्या पथकाने केली.