Malegaon News: कुत्ता गोलीची नशा ते पाक कनेक्शन प्रकरण; मालेगाव पुन्हा चर्चेत का येतंय?

Malegaon ATS: एटीएसच्या कारवाईने संशयाची सूई; एमडीतही भेसळ
Malegaon
MalegaonPudhari
Published on
Updated on

मालेगाव ( नाशिक ) : प्रमोद सावंत

बनावट जन्म दाखला प्रमाणपत्र, शिक्षण क्षेत्रातील तीन उच्च अधिकार्‍यांची अटक या दोन्ही प्रकरणांतील एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. त्या पाठोपाठ आंध्र प्रदेश एटीएसची कारवाई व बनावट नोटा प्रकरणांमुळे राष्ट्रीय पातळीवर शहर पुन्हा चर्चेत आले आहे. देश विघातक कारवाया व बनावट नोटा प्रकरणांचे धागेदोरे राष्ट्रीय पातळीवर असू शकतात.

या गुन्ह्यांमध्ये आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. बनावट नोटांच्या प्रकरणातही आता एटीएसची एन्ट्री झाली असून, हे प्रकरण वाटते तितके सोपे नसून, तो आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील नुमानीनगर भागातून आंध्र प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मालेगाव पोलिसांच्या मदतीने हाफीज तौसिफ असलम शेख याला सोशल मीडियावरून शेजारील व शत्रू राष्ट्रांशी संपर्क व माहिती पुरवित संवाद साधल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.

Malegaon
जळगाव बनावट जन्म-मृत्यू दाखला प्रकरण: २ वकिलांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

टेलर काम करणार्‍या हाफीजची अद्यापही सुटका झाली नसल्याने या आरोपांना बळकटी मिळाली आहे. या कारवाई वेळीच उत्तर प्रदेशातूनही दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. त्याच वेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तौसिफ शेखच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला तो निरपराध असल्याचे अकांडतांडव केले होते. त्यांचा आवाजही क्षीण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर यात आणखी काही संशयित मिळण्याची शक्यता आहे. दहशतवादविरोधी पथक अशा संशयितांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. दहशतवादविरोधी पथकाची कारवाई शहरवासीयांच्या स्मृतिपटलावरून जात नाही, तोच बनावट नोटा प्रकरणांनी खळबळ उडाली. मध्य प्रदेशातील नाजीर अकरम मोहम्मद अय्युब अन्सारा (रा. मोमीनपुरा, बुर्‍हाणपूर) व मौलाना मोहम्मद जुबैर मोहम्मद अशरफ अन्सारी (रा. हरीरपुरा, बुर्‍हाणपूर) या दोघांना पोलिसांनी महामार्गावरील हॉटेलसमोरून 29 ऑक्टोबरला ताब्यात घेतले. त्यावेळी या दोघांजवळ 10 लाखांच्या बनावट नोटा मिळून आल्या. महामार्गावर मिळून आलेल्या दोन संशयितांचा शहराशी संपर्क असावा याची अनेकांना थोडीही शक्यता वाटत नव्हती.

तथापि, तालुका पोलिसांच्या चौकशीत या दोघांचे शहरातील संबंध उघडकीस आले. तालुका पोलिसांनी शहरातून रविवारी तौसिफ मोहम्मद अकरम याला अटक केली. हे संशयित अद्यापही पोलिस कोठडीत आहेत. तौसिफने दीपावलीच्या कालावधीत शहरात सहा लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे सांगितले. अशातच या प्रकरणाचे धागेदोरे चांदवडपर्यंत पोहोचले आहेत. चांदवड येथून पोलिसांनी अमजन शमसुद्दीन कोतवाल (40, रा. मोदी अपार्टमेंट) याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ 500 रुपयांच्या 53 बनावट नोटा आढळल्या. ही स्थिती पाहता बनावट नोटा चलनात आणून येथील अर्थव्यवस्थेला नख लावण्याचे हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असावे, असा संशय आहे. त्यातच या संशयितांमध्ये मोहम्मद जुबेर हा मौलाना असल्याने या प्रकरणाला वेगळे महत्त्व आले आहे. तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार भदाणे व सहकार्‍यांनी नजीर अकरमच्या मध्य प्रदेशातील घराची झडती घेतली असता, तेथे 50 हजारांची रोख रक्कम मिळून आली. संशयित कमी चलन घेऊन बनावट नोटा वापरण्यासाठी सावज शोधत असल्याचा संशय आहे. याच प्रकरणी पोलिसांना मध्य प्रदेशातील आणखी एक संशयित डॉ. प्रतीक नौलखा याचा शोध घ्यावयाचा आहे. त्याच या नोटा नजीर व मौलाना मोहम्मद जुबेर यांना पुरविल्याचा संशय आहे. या दोघांना अटक झाल्यापासूनच प्रतीक फरार आहे. एकूणच हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. त्याचे धागेदोरे व पाळेमुळे आणखी दूरवर आणि खोलवर जाऊ शकतात.

कुत्ता गोलीची नशा करणार्‍या शहरात एमडीचा शिरकाव; भेसळीचा फंडा

शहरातील गुन्हेगारांसह तरुण नशेसाठी कुत्ता गोलीच्या (अल्प्राझोलम) आहारी गेला आहे. अल्प्राझोलमची 15 गोळ्यांची स्ट्रीप बाजारात अवघ्या 150 रुपयांना मिळते. या गोळीवर बंदी असताना काळ्या बाजारात ही गोळी 200 ते 250 रुपये दराने विक्री होते. मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल व मुंबई मार्केट मार्गे या गोळ्या शहरात येतात. नशेसाठी खोकल्याच्या औषधीचाही वापर होतो. स्वस्तातील नशा केली जात असताना, येथील एमडी पावडरचा शिरकाव चिंताजनक आहे. अडीच ते तीन हजार रुपये ग्रॅम मिळणारी एमडी पावडर जप्तीच्या साधारणत: शहरात पाच कारवाया झाल्या आहेत. सर्वसाधारण नशा करणारे नशेखोर एमडी पावडर कशी खरेदी करू शकतात? या प्रश्नाचेही कोडे उलगडले आहे. एमडी पावडरमध्ये अजिनोमोटो, सोडा सारख्या अन्य पावडरींची भेसळ करून एमडी पावडर स्वस्त दरात विकण्याचा फंडा शहरात सुरू आहे. तरीदेखील एमडीचा शहरातील शिरकाव चिंताजनक आहे. येथील स्थानिक गुन्हे शाखेने मनमाड रस्त्यावरील कौळाणे फाटा येथे सापळा रचून हसन सत्तार शेख (35, बांद्रा, हल्ली हिरापुरा) व अब्दूल रहेमान जमील अहमद (30, रा. शफियाबाद) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ 53 हजारांची एमडी पावडर व दुचाकी जप्त करण्यात आली. एमडी पावडर मुंबई, नाशिक मार्गे शहरात विक्रीसाठी येत असल्याचा संशय आहे. नाशिक जवळ एमडीचा कारखाना उद्वस्त झाल्यापासून जिल्हा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news