

मालेगाव : जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एक हजार बांगलादेशी व रोहिंग्यांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या नावाची यादी कागदोपत्री पुराव्यासह पोलिसांना दिली आहे. त्याचप्रमाणे 38 जणांनी बनावट कागदपत्रे दाखल करत जन्म प्रमाणपत्र घेतले आहे, अशा लोकांच्या नावाचीदेखील यादी कागदपत्रांसह पोलिसांना दिली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
मनपा आयुक्तांवर ताशेरे जानेवारी ते जून 2024 या सहा महिन्यांच्या कालावधीत 200 ते 250 अर्ज दाखल झाले होते. तेच जुलै ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांच्या कालावधीत 2800 अर्ज दाखल झालेत. ही बाब संशयास्पद आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी किंवा मंत्रालयात विचारणा करणे गरजेचे होते. बनावट जन्म प्रमाणपत्रे देणार्या अशा सर्व अधिकारी, कर्मचार्यांना जाब द्यावा लागेल.
किरीट सोमय्या, भाजप नेते.
मंगळवारी (दि. 4) छावणी पोलिस ठाण्यात जबाब देण्यासाठी सोमय्या आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. मालेगाव तहसील कार्यालयातून जवळपास चार हजारांहून अधिक जन्म प्रमाणपत्र वितरित झालेले असून, अर्जदारांनी खोट्या माहितीच्या आधारे जन्म दाखले मिळवले आहेत. त्यांनी न्यायालयासह सरकारी यंत्रणेची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी 100 नागरिकांची नावे त्यांनी पुराव्यासह छावणी पोलिसांना देत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता, तीन नागरिकांनी जन्म प्रमाणपत्रासाठी खोटे कागदपत्रे दिल्याचा प्रकार उघडीस आला.
याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीअंती तिघांना अटक करण्यात येऊन न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याच प्रकरणात तक्रारदार सोमय्या हे जबाब देण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी जबाब दिल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सोमय्या म्हणाले की, जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एक हजार बांगलादेशी व रोहिंग्यांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या नावांची यादी कागदोपत्री पुराव्यासह पोलिसांना दिली आहे. त्याचप्रमाणे 38 बांगलादेशी नागरिकांनी धान्यपुरवठा व तहसील कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचार्यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्रे घेतली आहेत. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे, शासनाची फसवणूक करून जन्म प्रमाणपत्र मिळविल्याचे कागदोपत्री पुरावे व त्यांच्या नावांची यादीदेखील पोलिसांना दिली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. लवकरच याची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दखल होईल असेही ते म्हणाले.