

मालेगाव (नाशिक ) : शहरासह परिसरात आठवडाभरापासून सूर्यदर्शन झालेले नाही. सहा दिवसांच्या 72 तासांत अवघे 16 तास ऊन पडले. जिल्ह्यात दि. 24 ते 30 ऑक्टोबर हवामान खात्याने दिलेला यलो अलर्ट, या दिवसांत झालेला सततचा पाऊस यामुळे शेतकरी तर पूर्ण उध्द्वस्त झाला.
जीवघेण्या व साथ आजारांनी डोके वर काढले. तसाच व्यापार व उद्योगालाही फटका बसला. आठवड्यापासून फेरीविके्रते, रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेते, खाऊ गल्ली, कॉलेज चौपाटीवर शुकशुकाट आहे. बाजार पेठेतील वर्दळही कमी झाल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. खाद्य पदार्थ विक्रेते व आठवडेबाजारात व्यवसाय करणार्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक फटकाही बसला आहे. तालुक्यात ऑक्टोबरमध्ये सरासरी 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या महिन्याच्या कालावधीत सहा मंडळांत सरासरी 100 ते 125 मिमी पावसाची नोंद झाली. वडनेर मंडळात 145 मिमी, तर अजंग मंडळात 154.8 मिमी पाऊस झाला. एकंदर ऑक्टोबरमधील हा पाऊस शेतकर्यांप्रमाणेच उद्योग व्यावसायिकांच्याही मुळावर उठला. दीपावली काळात पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे उद्योग व्यापार्यांना काहीसा दिलासा मिळाला होता.
या हंगामातील शहराचे सरासरी तापमान एरवी 32 अंश सेल्सिअस असते. दि. 25 ऑक्टोबरपासून तापमानात विक्रमी घसरण झाली. दि. 28 ऑक्टोबर वगळता, दि. 25 ते 30 ऑक्टोबरपर्यंत मालेगावचे तापमान 27 अंश सेल्सिअस नोंदले गेले. अन्य 10 दिवस तापमानाचा पारा घसरलेलाच होता. शहर व तालुक्याची पावसाची सरासरी 457 मिमी आहे. समाधानकारक पाऊस झाला, तरी 500 मिमी पाऊस पडतो. यावेळी प्रत्यक्षात 716 मिमी पावसाची नोंद झाली असून, पावसाची ही टक्केवारी 142 टक्के आहे. 50 टक्के जास्तीचा पाऊस झाल्याने शेतशिवार जलमय झाले आहे. खरिपातील एकही पीक नुकसानीपासून वाचलेले नाही. सर्व पिके, फळबागा, भाजीपाला, कांदा, कापूस यांना या अतिवृष्टीचा फटका बसला. खरीप हंगाम वाया गेल्यामुळे तालुक्याचे अर्थकारणही बिघडणार आहे. त्याचा फटका येथील अर्थव्यवस्थेला बसेल. बुधवारी (दि. 29) रात्री शहरासह परिसराला पावसाने झोडपले. 13 पैकी आठ मंडळांत पावसाने जोरदार हजेरी लावली. शहर व सायने मंडळात 43.8 मिमी पावसाची नोंद झाली. अन्य सहा मंडळांमध्ये सरासरी 10 मिमी पाऊस झाला. एकत्रित 13 मंडळांतील पावसाची सरासरी 14 मिमी होती. गुरुवारीही शहरात दिवसभर टप्प्याटप्प्याने पावसाने हजेरी लावली. गुरुवारीही सूर्यदर्शन झाले नाही. सततच्या पावसामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते उखडले आहेत. सर्वाधिक वर्दळीच्या गूळ बाजार व मोसम पूल चौकात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत तुरळक वाहतूक असतानाही या भागात वाहतूक कोंडी होत होती.