

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिकेच्या महापौरपदाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चाना अखेर पूर्णविराम मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन असे एकूण पाच नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करून शहराच्या विकासासाठी मालेगाव सेक्युलर फ्रंटला अधिकृत पाठिंबा देणार असल्याची माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष एजाज बेग यांनी खासगी कार्यक्रमात दिली. त्यामुळे सेक्युलर फ्रंटचे संख्याबळ ४५ वर पोहोचले असून, महापौरपदाबाबत निर्णायक आघाडी मिळाल्याचे मानले जात आहे.
महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर होताच, सेक्युलर फ्रंटने ४० जागा जिंकत महापौरपदावर दावा केला होता. त्यानंतर एमआयएम, काँग्रेस व शिवसेना यांना पाठिंब्यासाठी अधिकृत आवाहन करण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात एमआयएम आणि काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा होती. मात्र, काही काळ ठोस निर्णय झाला नसल्यामुळे महापौर निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
याच काळात एमआयएम, काँग्रेस, शिवसेना तसेच भाजपच्या संभाव्य आघाड्यांच्या चर्चामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले होते. विविध पक्षांच्या हालचालींमुळे महापौरपदाचा सस्पेन्स ? कायम राहिला होता. दरम्यान, इस्लाम पक्षाचे ३५ व समाजवादी पक्षाचे ५ असे एकूण ४० नगरसेवक आधीपासूनच सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी आहेत. इस्लाम पक्षाचे संस्थापक व माजी आमदार आसिफ शेख यांनीही महापौरपदासाठी दावा व्यक्त केला होता.
अशा परिस्थितीत काँग्रेसचे ३ व भाजपाचे २ नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करून सेक्युलर फ्रंटला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने सत्तासमीकरण स्पष्ट झाले आहे. याबाबत बुधवारी (दि. २८) नाशिक येथे या सर्व नगरसेवकांची बैठक झाली आहे. एजाज वेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पाठिंबा पूर्णपणे औपचारिक असून, येणाऱ्या महापौर निवडणुकीत सेक्युलर फ्रंटच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान केले जाणार आहे.
परिणामी, सेक्युलर फ्रंटचे संख्याबळ ४५ वर पोहोचले असून, महापौरपदावरील सस्पेन्स जवळपास संपुष्टात आल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. तरीही येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीपर्यंत कोणतीही अनपेक्षित राजकीय घडामोड घडते का? याकडे मालेगावकरांचे लक्ष लागलेले असून, अंतिम क्षणापर्यंत शहरातील लहान मोठ्या राजकीय हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
महापौर निवड ७ फेब्रुवारीला
मालेगाव महानगरपालिका महापौर, उपमहापौर निवडीसाठी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिका सभागृहात विशेष महासभा बोलाविली आहे. या सभेचे पीठासन अधिकारी विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टीला सर्वाधिक ३५ जागा मिळाल्या.
इस्लामचा मित्रपक्ष समाजवादी पार्टीला ५ जागा मिळाल्याने मालेगाव सेक्युलर फ्रंटचे संख्याबळ ४० झाले आहे. बहुमतासाठी त्यांना ३ सदस्यांची गरज होती. काँग्रेसचे ३ नगरसेवक आणि भाजपचे दोन अशा पाच नगरसेवकांचा गट एकत्रित भारतीय विकास आघाडी या नावाने स्थापन झाला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज वेग या आघाडीचे गटनेते असून, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मदन गायकवाड उपगटनेते असतील. या आघाडीच्या पाठिंब्यावर मालेगाव सेक्युलर फ्रंटला ४५चे संख्याबळ झाले आहे. २१ सदस्यीय एमआयएम, १८ नगरसेवक असलेल्या शिवसेनेची विरोधाची भूमिका असणार की, उर्वरित दिवसांत आणखी काही घडामोडी होणार याबाबत उत्सुकता आहे.