

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे टी पॉइंट ते एक्स्लो पॉइंट या मार्गावर महानगरपालिकेमार्फत सिमेंट कॉक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत नाशिक शहर वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्गाची अधिसूचना निर्गमित केली असून, वाहनचालकांनी त्यानुसार पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गरवारे टी पॉइंट ते एक्स्लो पॉइंटदरम्यान दुभाजकाच्या डाव्या (विरुद्ध) बाजूवरील मार्गिकेवर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येत आहे. मात्र, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये प्रवेश तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी एक्स्लो पॉइंटकडून गरवारे टी पॉइंटकडे येणाऱ्या दुभाजकाच्या उजव्या (विरुद्ध) बाजूवरील मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे.
यानुसार एक्स्लो पॉइंटकडून गरवारे टी पॉइंट मार्गे बाहेर पडणारी वाहतूक बंद ठेवून ती टेक्नोफोर्स कंपनी, सेंट्रल वेअर हाउस, लिअर कंपनी, एबीबी कंपनी, हॉटेल वेलकम मार्गे एनएच-३ हायवे सर्व्हिस रोडकडे वळविण्यात आली आहे.
सार्वजनिक सुरक्षितता, वाहतूक कोंडी टाळणे व नागरिकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने गरवारे ते एक्स्लो हा मार्ग कॉक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे), अतिरिक्त कार्यकारी पोलिस उपायुक्त संदीप मिटके यांनी ही अधिसूचना जारी केली.
कामाच्या ठिकाणी सुरक्षा व वाहतूक नियोजन
काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग करणे, प्रवेश बंद, काम सुरू आहे, डायव्हर्जन मार्ग, सावकाश जा, नो पार्किंग आदी सूचना फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी पुरेसा प्रकाश, ब्लिंकर, रिफ्लेक्टर बोर्ड, सुरक्षा जॅकेट, हेल्मेट आदींची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच २० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही अधिसूचना दि. ३० जानेवारी २०२६ ते दि. २९ एप्रिल २०२६ या कालावधीत अंमलात राहणार आहे.
पर्यायी मार्ग व्यवस्था
गरवारे टी पॉइंटकडून एक्स्लो पॉइंटकडे जाणारी वाहने दुभाजकाच्या उजव्या बाजूच्या मार्गावरून क्रॉम्प्टन कंपनी, ब्लू क्रॉस, ग्लॅक्सो, सिमेन्स, पॉवर हाउस, नेटविन, आर. पी. स्वीट, नाशिक क्लस्टर कंपनीमार्गे
एक्स्लो पॉइंटकडे वळविण्यात आली आहे. एक्स्लो पॉइंटकडून गरवारेकडे येणारी वाहने प्रणव स्टॅम्पिंग, टेक्नोफोर्स, अजिंठा हॉटेल, आकाश उद्योग, सेंट्रल वेअर हाउस, लिअर, एबीबी, हॉटेल उत्सव, टाल्को इंडिया, अरिहंत अॅल्युमिनियम, हॉटेल वेलकममार्गे एनएच-३ हायवेने गरवारे टी पॉइंटकडे जातील.