Malegaon Mayor Election | महापौर निवडणुकीपूर्वी 'सेक्युलर फ्रंट'ची पर्यटनवारी

Malegaon Mayor Election | दगाफटका टाळण्यासाठी 40 नगरसेवक रवाना
Malegaon Mayor Election
Malegaon Mayor Election
Published on
Updated on

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये तसेच फुटाफुटीची शक्यता टाळण्यासाठी इस्लाम व समाजवादी पार्टीने खबरदारीचा उपाय अवलंबला आहे. सेक्युलर फ्रंटचे नवनियुक्त ४० नगरसेवक सुरक्षिततेच्या कारणास्तव शहराबाहेरील अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले. महापौरपदाचे आरक्षण गुरुवारी (दि. २२) जाहीर होणार असून, त्यानंतर तत्काळ निवडणूक प्रक्रिया राबविली जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Malegaon Mayor Election
Nashik Traffic News | सीतागुंफा-काळाराम मंदिर परिसरात 70 दिवस वाहतूक बंद

सत्ताधारी गटातही मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संभाव्य प्रलोभन, दबावतंत्र तसेच फोडाफोडीचे राजकारण रोखण्यासाठी इस्लाम पार्टीने आपल्या सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही प्रकारचा संपर्क, राजकीय दबाव किंवा आमिष यापासून नगरसेवकांना दूर ठेवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, इस्लाम पार्टीचे संस्थापक व माजी आमदार आसिफ शेख तसेच समाजवादी पार्टीचे नेते मुस्तकीम डिग्निटी यांनी महापौर निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवार निश्चित करून आघाडी, पाठिंबा आणि संख्याबळ मजबूत ठेवण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महापौरपद सर्वसाधारण अथवा इतर मागासवर्ग झाल्यास माजी आमदार शेख यांचे बंधू खालीद शेख यांची निवड निश्चित मानली जात आहे. या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे. फ्रंटला काँग्रेसचा पाठिंबा हमखास मिळण्याची शक्यता आहे.

तथापि, शहराध्यक्ष तथा नगरसेवक एजाज बेग यांनी स्थायी समिती सभापतिपदाचा हट्ट धरला आहे. त्या पार्श्वभूमीवर फ्रंटने एमआयएमलादेखील बिनशर्त पाठिंब्यासाठी साकडे घातले आहे. एमआयएमच्या नेत्यांशी फ्रंटच्या संसदीय समितीची चर्चेची पहिली फेरी पार पडली आहे. अशातच सध्या तरी महापौर व मनपा तिजोरीची चावी मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदावरच चर्चा सुरू आहे.

त्याचवेळी मालेगाव सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी समाजवादी पार्टीला उपमहापौरपद मिळणार की काय याचीही चर्चा सुरू आहे. सभागृहातील कामकाज पाहण्यासाठी महापौरांच्या दिमतीला उपमहापौर जाणकार व हुशार असावा, अशी बहुसंख्य वेळी भूमिका असते. त्या पार्श्वभूमीवर उपमहापौरपदासाठी शानेहिंद निहाल अहमद अथवा मुस्तकीम डिग्निटी यांचा विचार होऊ शकतो. या दाम्पत्याने कायद्याचे शिक्षणदेखील घेतलेले असून, दोघे माजी नगरसेवक आहेत.

Malegaon Mayor Election
Nashik Crime News | गौतमऋषी प्रदक्षिणा मार्गावर महिलांना लुटणारी टोळी जेरबंद

नगरसेवकांची पर्यटनवारी का?

मालेगाव सेक्युलर फ्रंटमधील इस्लामला ३५ व समाजवादी पक्षाला ५ अशा एकूण ४० जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी त्यांना अवघ्या तीन जागा हव्या आहेत. नव्याने स्थापन झालेल्या इस्लाममध्ये फुटीची शक्यता नाही. मोजके दोन-तीन नगरसेवक स्वतःच्या करिष्म्यावर निवडून आले आहेत.

उर्वरित बहुसंख्य जण इस्लाम पार्टीची हवा व माजी आमदार आसिफ शेख यांच्या पाठबळावर विजयी झाले आहेत. तरीदेखील ही पर्यटनवारी का? असा सवाल उपस्थित होत आहे. तथापि, प्रचाराचा शीन व थकवा घालविणे हाही हेतू त्यामागे आहे. तसेच एखाद्या मातब्बर नगरसेवकाच्या मनात महापौरपदाची सुप्त इच्छा झाल्यास त्याने गणित बिघडवू नये यासाठीही ही खबरदारी घेतल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news