

मालेगाव (नाशिक ): मालेगाव - कुसुंबा रस्त्यावरील वडगाव बसस्थानकानजीक जानकाईनगरजवळ आजीसमवेत रस्त्याने जाणार्या नातीला भरधाव दुचाकीने जबर धडक दिल्यामुळे सातवर्षीय बालिका गंभीर जखमी झाली.
रविवारी (दि. 14) सकाळी 9.45 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बालिकेची स्थिती व सततच्या अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गतिरोधक, सर्व्हिस रोड यांसह विविध मागण्यांसाठी दीड तास रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. ज्ञानेश्वर खैरनार यांच्या दोन पुतण्या आजीसमवेत रस्त्याने जात होत्या. दुचाकी (एमएच 41, बीके 6342) वर आलेल्या चालकाने यातील कल्याणी शरद खैरनार (7) हिला जबर धडक दिली. कल्याणी रस्त्याच्या कडेलाच होती. अशातही हा अपघात झाल्याने व त्यात ती गंभीर जखमी झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. अपघातस्थळाजवळच बसस्थानक व मुख्य चौक आहे. त्यामुळे मोठी गर्दी जमा झाली होती. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने रास्ता रोको केला. दारू खरेदीसाठी आलेल्या टवाळखोर तरुणांमुळे हा अपघात झाला.
नजीकच्या काळातील हा दहावा अपघात आहे. या रस्त्याने अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. सुरक्षिततेच्या कुठल्याही उपाययोजना नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला. अपघात व आंदोलनाची माहिती मिळताच वडनेर खाकुर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी आंदोलकांची समजूत काढली. तुमच्या मागण्यांची दखल घेऊन, यासंदर्भात संबंधित विभागाला तातडीने कळवून उपाययोजना करण्यास सांगू, असे सांगितल्यानंतर तब्बल दीड तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. जखमी बालिकेवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठ दिवसांत गावाच्या दोन्ही बाजूंना एक किलोमीटर अंतरापर्यंत गतिरोधक नसल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला. आंदोलनात माजी सरपंच शशिकांत राजकोर, ज्ञानेश्वर खैरनार, दीपक शेवाळे, आनंदा अहिरे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, विकास संस्थेचे सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.