

Malegaon development of Urdu schools Dada Bhuse
मालेगाव : पुढारी वृत्तसेवा विद्यार्थ्यांना आनंददायी, गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व उर्दू शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.
महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये उर्दू शाळांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आयुक्त रवींद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे, उपायुक्त गणेश शिंदे, प्रशासनाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. या बैठकीत उर्दू शाळांच्या वर्तमान स्थितीचा आढावा घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांनी कलागुणांना वाव देणाऱ्या उपाययोजना कराव्यात. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अत्याधुनिक शिक्षण, ई- सुविधा आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यात येईल. शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी वेळोवेळी करावी. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा. स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आदी सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात. शाळेच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्काळ कारवाई करावी. शाळा इमारतींचे ऑडिट करून आवश्यक सोयी-सुविधांसाठी प्रस्ताव सादर करावेत. पालकांशी समन्वय ठेवून विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे. नियमित संवादासाठी विद्यार्थी पालक शिक्षक मेळावे आणि वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करावे. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा, अशा सूचना मंत्री भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम समर्पित भावनेने करतात. शाळेतील शिक्षक, शाळा व विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असल्याचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी शिक्षक व शाळेच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात प्रशासनाधिकारी चंद्रकांत पाटील यांनी महानगरपालिका क्षेत्रातील शाळांसाठी राबविले जात असलेले उपक्रम, विविध योजना व शाळांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. आढावा बैठकीपूर्वी झालेल्या पालक मेळाव्यात भुसे यांनी पालकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक व शिक्षकांकडून शिष्यवृत्ती, सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या, युनिफॉर्म (युडाईस), वीज-पाणी, इमारत, सीसीटीव्ही, शाळा कंपाउंड, शिक्षकांच्या पदोन्नती, पदे भरणे आदी समस्या जाणून घेतल्या. या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन मंत्री भुसे यांनी दिले.