

सिडको (नाशिक) : हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड (एचएएल)च्या माध्यमातून विविध प्रकारच्या विमानांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सुटे भागांच्या निर्मितीत स्थानिक उद्योजकांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सुमारे ४० टक्क्यांहून अधिक सुटे भाग भारतात तयार होत असून, उर्वरित ६० टक्केही देशातच बनवून ही विमाने पूर्णतः भारतीय बनावटीची करण्याचा एचएएलचा उद्देश असल्याचे आयमा इंडेक्सअंतर्गत आयोजित चर्चासत्रात स्पष्ट करण्यात आले.
एचएएलच्या एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे कार्यकारी संचालक शिरीशकुमार पात्रा, उत्पादन विभाग प्रमुख नसीर उल्हा, तसेच ऑपरेशन विभागाचे महाव्यवस्थापक सुब्रत मंडल यांनी उद्योजकांशी थेट संवाद साधत एचएएलच्या भावी योजनांची माहिती दिली. नाशिकमध्ये तयार होणाऱ्या एलसीए (लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट), एचटीटी-४० (हिंदुस्तान टर्बो ट्रेनर) यांसह एकूण तीन विमानांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या विविध सुटे भागांचे उत्पादन स्थानिक पातळीवर व्हावे, हा एचएएलचा प्रमुख उद्देश आहे. सध्या या विमानांसाठी आवश्यक असलेली काही उपकरणे नाशिकमध्येच तयार केली जात असून, भविष्यात उत्पादनाचा हा टक्का वाढवत १०० टक्के सुटे भाग नाशिकमधूनच घेऊन 'मेक इन इंडिया'च्या धर्तीवर पूर्णतः देशी विमाने निर्माण करण्याचा मानस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महिला उद्योजकांना विशेष संधी देण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र विशेष सेल तयार करण्यात आला असून, अधिकाधिक महिला उद्योजकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन देण्यात येत आहे. या सेलच्या माध्यमातून तांत्रिक माहिती, नोंदणी प्रक्रिया तसेच उत्पादनाशी संबंधित अडचणींवर थेट मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.