

नगरसुल (नाशिक) : खिर्डीसाठे येथे पंचवीस एकरातील मक्याची साठवून ठेवलेली गंजी अज्ञात समाजकंटकाने पेटवून दिल्याने नागरे कुटूंबांला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. सुमारे पंचवीस एकरात पिकविलेला मका या आगीत खाक झाल्याने दिवसरात्र कष्ट करुन तयार केलेला मालाची राख झाली.
खिर्डीसाठे (ता. येवला) येथील वाल्मिक नागरे यांच्या शेतात पंचवीस एकरातील मक्याची गंजी अज्ञाताने पेटवून दिली. सोंगणी करून कणसे डोंगराजवळ मोकळ्या जागेत साठवून ठेवलेले होते. रविवारी (दि.7) रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात समाज कंटकाने या ठिकाणी येऊन प्रथम मद्यप्राशन केले आणि नंतर ज्वलनशील पदार्थ टाकून मक्याच्या गंजीला आग लावून तेथून पसार झाले. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर पहाटेला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीत सर्वच मका बेचिराख झाला होती. नागरे कटुबियांचे सुमारे वीस ते बावीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार व पोलीस फौजफाटा यांनी घटनास्थळी येऊन श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने गुन्हेगारांचा शेध सुरू केला आहे.