

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांच्या समस्या आणि कृषी निविष्ठांच्या गरजा जाणून घेत त्यावर तातडीने व व्यवहार्य उपाययोजना कराव्यात. दर्जादार कृषी निविष्ठा योग्य दरात व गरजेच्या वेळी उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महामंडळाच्या उपक्रमांचा प्रभावी वापर करावा, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिले.
व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी नाशिक जिल्ह्याचा दोनदिवसीय दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट संवाद साधला. इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरातील शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पिकांची सद्यःस्थिती, खते व कीटकनाशकांची गरज, कृषी निविष्ठांचा दर्जा, उत्पादन खर्च आणि बाजारपेठेशी संबंधित समस्यांचा आढावा घेतला.
शेतकऱ्यांकडून मिळणारा थेट अभिप्राय हा नियोजन व निर्णय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी क्षेत्रीय स्तरावरील प्रश्नांवर व्यवहार्य व कालबद्ध कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
मालेगाव परिसरातील शेतकरी बांधवांशी संवाद साधताना त्यांनी महामंडळाची खते, कीटकनाशके, पशुखाद्य, कृषी अभियांत्रिकी साहित्य आणि NOGA उत्पादने वाजवी दरात व गरजेच्या वेळी उपलब्ध करून देण्यावर भर दिला. तसेच मालेगाव तालुक्यातील अजंग येथील महामंडळाच्या जैविक खते व कीटकनाशकेनिर्मिती प्रकल्पाला भेट देऊन उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, साठवणूक आणि पुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. कारखान्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून प्रकल्प लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
गावपातळीवर नियमित 'शेतकरी संवाद बैठका' आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना याप्रसंगी दिले. या बैठकांमधून शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन, अनावश्यक निविष्ठांचा वापर टाळणे, पिकांचे नुकसान रोखणे आणि 'महा ॲग्रो मार्ट'द्वारे उपलब्ध होणाऱ्या बाजारपेठीय संधींची माहिती देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.