

नाशिक : आसिफ सय्यद
राज्यात वाढत्या प्रद्यणाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची झपाट्याने होणारी वाढ गंभीर चिंता निर्माण करणारी ठरत आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार गेल्या वर्षभरात वाहनसंख्येत ८.२ टक्क्यांची वाढ होऊन ती ५ कोटी २८ लाख ४९ हजार ५६० वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या वाढीत दुचाकी वाहनांचा मोठा वाटा आहे.
सार्वजनिक परिवहनाच्या अपुऱ्या क्षमतेकडे ही आकडेवारी थेट बोट दाखवत आहे. १ जानेवारी २०२५ रोजी राज्यात ४ कोटी ८८ लाख २५ हजार ७० वाहने होती. हीच संख्या वर्षभरात ४० लाखांहून अधिक वाहनांनी वाढून १ जानेवारी २०२६ रोजी ५ कोटींचा टप्पा ओलांडून ५.२८ कोटींवर गेली.
दुचाकी वाहनांत २३ लाख ७४ हजार ६२० इतकी भर पडली. सध्या त्यांची संख्या ३ कोटी ७८ लाख १७ हजार ५७० इतकी आहे. दुचाकी वाहनांचा हा वाढता आकडा सार्वजनिक परिवहनाच्या कमकुवतपणाचे द्योतक मानला जात आहे. बस, रेल्वेसारख्या पर्यायांची मर्यादित उपलब्धता आणि वाढत्या शहरीकरणामुळे नागरिक खासगी वाहनांकडे वळत आहेत.
चारचाकी वाहनांत मोठी वाढ दिसून येते, कार, जीप, टॅक्सीची संख्या ८२ लाख ४४ हजार ६१० वर पोहोचली आहे. वर्षभरात जवळपास ६ लाखांनी वाढ झाली आहे. कमी व्याजदरात सहज उपलब्ध होणाऱ्या वाहन कर्जामुळे वाहन खरेदीकडे वाढता कल दिसून येत आहे.
ऑटो रिक्षांची संख्या १२ लाख ९६ हजार ४३० झाली आहे. त्यात ७३ हजार ५९० ची वाढ नोंदवली गेली. मालवाहतूक वाहनांत २४ टक्के आणि ट्रॅक्टरमध्ये २७.७ टक्के वाढ झाल्याने आर्थिक हालचालींना गती मिळाल्याचे संकेत मिळतात. राज्यात सध्या २९ लाख ९२ हजार ९३० मालवाह वाहने, १५ लाख ९३ हजार ४७० ट्रॅक्टर, २ लाख १ हजार २६० प्रवासी बसेस, २६ हजार रुग्णवाहिका आणि १ लाख ५७हजार इतर वाहने नोंदणीकृत आहेत.
दर लाख लोकसंख्येमागे ४१ हजार वाहने आणि दर किलोमीटर रस्त्यामागे १५३ वाहनांचा ताण असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच, वाढती वाहनसंख्या ही पर्यावरण, आरोग्य आणि शहरी व्यवस्थापनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून सार्वजनिक परिवहन सक्षम करणे आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा प्रसार करणे अत्यावश्यक बनले आहे.
राज्यात ९.२७ लाख इ-वाहने
दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांचा वापरही वाढत असून, डिसेंबर २०२५ अखेर राज्यात ९ लाख २७ हजार ६१ इ-वाहने नोंदली गेली आहेत. शासनाच्या धोरणामुळे या क्षेत्राला चालना मिळत असली तरी चार्जिंग सुविधांचा विस्तार आवश्यक ठरत आहे.