

नाशिक : आसिफ सय्यद असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-श्रम पोर्टलला महराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील १.८३ कोटी कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. यात महिलांचा सहभाग ५५.८ टक्के इतका असल्याने असंघटित क्षेत्रातील महिलांचे वाढते योगदान अधोरेखित झाले आहे.
ई-श्रम पोर्टलवरील राज्यातील नोंदणीच्या आकडेवारीचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता तरुण कामगारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. १८ ते ४० वर्षे वयोगटातील कामगारांचा वाटा ५१.७ टक्के असून, ४० ते ५० वर्षे वयोगटातील कामगारांचे प्रमाण २६.८ टक्के आहे. यावरून राज्यातील असंघटित क्षेत्रात तरुण आणि मध्यमवयीन कामगारांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट होते.
व्यवसायनिहाय पाहता कृषी क्षेत्रातील कामगारांचे प्रमाण सर्वाधिक असून त्यानंतर बांधकाम, घरेलू कामगार, वाहतूक, वस्त्रोद्योग आणि चर्मोद्योग या क्षेत्रांचा क्रम लागतो. पर्यटन, आरोग्यसेवा, किरकोळ व्यापार, शिक्षण आणि आयटी क्षेत्रातील कामगारांचाही यात समावेश आहे. त्यामुळे असंघटित क्षेत्राची व्याप्ती किती व्यापक आहे, हे स्पष्ट होते. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
धोरणात्मक नियोजनाला बळ
तज्ज्ञांच्या मते ई-श्रम पोर्टलमुळे असंघटित कामगारांची अचूक व व्यापक माहिती उपलब्ध होत असल्याने शासनाला धोरणात्मक निर्णय घेणे सुलभ होत आहे. विविध क्षेत्रांतील कामगारांचे वर्गीकरण आणि त्यांच्या गरजांनुसार योजना राबवणे शक्य होत आहे.
महत्त्वाची आकडेवारी
एकूण नोंदणीकृत कामगार १.८३ कोटी महिलांचे प्रमाण ५५.८% १८ ते ४० वयोगट ५१.७% ४० ते ५० वयोगट २६.८% २०२४-२५ बांधकाम कामगार २६.६७ लाख २०२५-२६ (ऑक्टोबरपर्यंत) १५.४३ लाख २०२४-२५ लाभार्थी ७०.५८ लाख २०२५-२६ (सप्टेंबरपर्यंत) ५१.९७ लाख