

नाशिक : तंत्रज्ञान युगात गुन्ह्यांचे नवनवीन प्रकार उदयास येत आहेत. या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांची भूमिका आव्हानात्मक असून, या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक सजगतेने काम करावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी केले. महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या 124 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनप्रसंगी जगमलानी बोलत होते. या तुकडीतील 620 पोलिस उपनिरीक्षक राज्य पोलिस दलात सहभागी झालेत.
नेहा कोंडेकर : 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'ची मानकरी - बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच
अभय तेली : बेस्ट कॅडेट इन आउटडोअर
नेहा कोंडेकर : सिल्व्हर बॅटन - बेस्ट कॅडेट इन स्टडीज
कृष्णा खेबडे : सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच
अक्षय झगडे : डॉ. बी. आर. आंबेडकर कप - बेस्ट कॅडेट इन लॉ
नेहा कोंडेकर : अहिल्याबाई होळकर कप - ऑल राउंड वुमन कॅडेट ऑफ द बॅच
अभय तेली : एन. एम. कामठे गोल्ड कप- बेस्ट कॅडेट इन राफल अँड रिव्हॉल्व्हर शूटिंग
नेहा कोंडेकर : यशवंतराव चव्हाण गोल्ड कप - ऑल राउंड कॅडेट ऑफ द बॅच
सागर लगड : बेस्ट कॅडेट इन ड्रिल
जगमलानी म्हणाले, महाराष्ट्र पोलिस अकादमी ही पोलिस अधिकाऱ्यांचा समृद्ध वारसा चालविणारी अकादमी आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत आपण पोलिस सेवेत दाखल होत असून, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नवीन पिढीचे साक्षीदार आहात. सरळसेवेतील ही पहिली तुकडी असून, सर्व प्रशिक्षणार्थींना सायबर गुन्ह्यापासून ते दहशतवादांपर्यंत, आर्थिक गुन्हे, हिंसाचार, अमली पदार्थ गुन्हेगारी, फौजदारी न्याय व्यवस्था अधिक कार्यक्षम करणे, गंभीर गुन्ह्यांचा सखोल व निष्पक्ष तपास निश्चित करणे, फॉरेन्सिक सहभाग, फॉरेन्सिक पुराव्यांचे संकलन व विश्लेषण प्रमाणित करणे आणि तपास वैज्ञानिक पद्धतीने करणे यासह नवीन कायद्यांचे प्रशिक्षण मिळाले आहे. या ज्ञानाचा उपयोग करून आपण सर्व जण नवीन आव्हानांना सामोरे जाल असा विश्वासही जगमलानी यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, उपसंचालक संजय बारकुंड, अनिता पाटील, डॉ. काकासाहेब डोळे, प्रदीप जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या 124 व्या तुकडीत 410 पुरुष व 210 महिला प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक होते. 24 नोव्हेंबर 2023 पासून तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले. या तुकडीत 83 टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व 17 टक्के पदव्युत्तर आहेत.