

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून, नाशिक विभागातील पीक नुकसानीपोटी तब्बल १४ हजार ५८७.७० लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी देण्यात आली आहे.
विभागातील पाच जिल्ह्यांतील एकूण १ लाख ४६ हजार ५७७ शेतकरी या मदतीस पात्र ठरले आहेत. महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार मोठ्या प्रमाणात फळबागा, भाजीपाला, कांदा, द्राक्ष, गहू तसेच इतर हंगामी पिकांचे नुकसान झाले होते.
त्यानंतर शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी देत ही मदत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक विभागात सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला असून, येथे ६५ हजार ७५६ शेतकरी बाधित झाले आहेत. या जिल्ह्यासाठी ७ हजार ३३४.९४ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
त्या खालोखाल जळगाव जिल्ह्यास ३ हजार ११४.६० लाख, अहिल्यानगर जिल्ह्यास २ हजार ५२०.०९ लाख, धुळे जिल्ह्यास १ हजार ५५१.५० लाख, तर नंदुरबार जिल्ह्यास ६६.५७ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा, कांदा पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते.
विशेषतः काढणीस आलेल्या पिकांवर पावसाचा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते. अनेक भागांत गारपिटीमुळे फळांचे नुकसान झाल्याने बाजारमूल्य घटले होते. दरम्यान, शासनाने मंजूर केलेली मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून निधी वितरणाला गती देण्यात येत आहे.