

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बाद महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर या व्यापारी, उद्योजकांच्या २०२६-२८ या द्विवार्षिक निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. अर्ज छाननीत उत्तर महाराष्ट्र विभागातील विरोधी पॅनलच्या प्रमुखांचेच अर्ज झाल्याने, निवडणुकीपूर्वीच आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शेठ वालचंद, हिराचंद प्रगती पॅनल आणि उत्तर महाराष्ट्र विकास पॅनलच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाचे उमेदवार कांतिलाल चोपडा आणि संजय सोनवणे यांचे अर्ज बाद झाले आहेत.
याशिवाय विरोधी पॅनलच्या उत्तर महाराष्ट्रातील गव्हर्निंग कौन्सिल पदासाठीचे ६० अर्ज बाद झाल्याने, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडत, न्यायालयीन लढाईच्या तयारी सुरू केली आहे. गेल्या २२ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर २५ व २६ जून रोजी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. मात्र, छाननीत विरोधी पॅनलच्या प्रमुखांचेच अर्ज बाद झाला आहे.
दुसरीकडे सत्ताधारी एकता पॅनलमधील एकही अर्ज बाद न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदासाठी नाशिकमधून ९ उमेदवारांनी २० अर्ज दाखल केले होते. त्यात कांतिलाल चोपडा यांनी दोन, तर संजय सोनवणे यांनी चार अर्ज दाखल केले होते. मात्र, दोघांचे सहाही अर्ज बाद झाले आहेत. हे दोन्ही उमेदवार विरोधी प्रगती आणि विकास पॅनलचे प्रमुख होते.
आता, संजय राठी, रतन पडवळ यांचे अर्ज वैध ठरविले गेल्याने, प्रगती पॅनलकडून उपाध्यक्षपदासाठी दोघांपैकी एकजण मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जळगाव उपाध्यक्षपदासाठी सहा उमेदवारांनी दहा अर्ज दाखल केले होते. त्यातील पाच अर्ज वैध ठरविण्यात आले असून, विरोधी प्रगती पॅनलचे किरण बच्छाव यांच्यासह पाच अर्ज बाद झाले आहेत.
तर वैध अर्जामध्ये विद्यमान उपाध्यक्ष तथा प्रगती पॅनलच्या संगीता पाटील यांचाही समावेश असून, त्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाच्या देखील उमेदवार आहेत. त्यांचे दोन्ही अर्ज वैध झाल्याने त्यांना दोनपैकी एका जागेसाठी आता मैदानात उतरावे लागणार आहे. तर एकता पॅनलचे सचिन शहा, अंजू सिंघल, दीपाली चांडक, राजाराम सांगळे, सुनीता फाल्गुने या सर्व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. याशिवाय, अहिल्यानगरमधून एका गव्हर्निंग कौन्सिलच्या जागेसाठी चार उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले होते.
ते सर्व अर्ज वैध ठरले आहेत. धुळे येथील तीन जागांसाठी १० उमेदवारांचे दहा अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी तीनच अर्ज वैध ठरले आहेत जळगावमधील चार जागांसाठी १७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी चार अर्ज वैध ठरले, तर नाशिकमधून २७ जागांसाठी १२८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ४० अर्ज बाद झाल्याने, ८८ उमेदवार आता मैदानात असतील. बाद झालेले सर्वच अर्ज विरोधी प्रगती आणि विकास पॅनलच्या उमेदवारांचे आहेत.
अध्यक्षांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी रवींद्र मानगावे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यांनी अध्यक्षपदासाठी चार अर्ज दाखल केले होते. ते चारही अर्ज वैध ठरले आहेत. याशिवाय अन्य एकाही उमेदवाराचा अर्ज नसल्याने, पुढील अध्यक्ष तेच असतील, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी करुणाकर शेट्टी आणि संगीता पाटील या मैदानात आहेत. मुंबई विभाग १ व पश्चिम मुंबई उपाध्यक्षपदी धनश्री हरदास व सर्जेराव नलावडे यांचेच अर्ज असल्याने, त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अन्य पदासाठी मात्र, निवडणूक अटळ मानली जात आहे.
महाराष्ट्र चेंबरमध्ये प्रचंड अनागोंदी कारभार सुरू आहे. ठराविक लोकच आपले हितसंबंध जपण्यासाठी चेंबरचा वर्षानुवर्षांपासून वापर करीत आहेत. कटकारस्थान करून आमचे अर्ज बाद ठरविले आहेत. आम्ही तक्रार निवारण समितीकडे तक्रारींचे अर्ज दिले होते. त्यातून दिलासा न मिळाल्यास, न्यायालयाचे दरवाजे ठोठावू.
कांतिलाल चोपडा, शेठ वालचंद, हिराचंद प्रगती पॅनल