

ठळक मुद्दे
कुंभमेळा हा नाशिकला जागतिक पर्यटन नकाशावर आणणारा सर्वात मोठा उत्सव
नाशिकचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रॅण्डींग करण्यासाठी मोहिम
युनेस्को आणि इन्क्रेडीबल इंडिया यांच्या सहकार्याने ग्लोबल कल्चरल हेरिटेज कॅम्पेनमध्ये नाशिकला स्थान
नाशिक : आसिफ सय्यद
कुंभमेळा हा नाशिकला जागतिक पर्यटन नकाशावर आणणारा सर्वात मोठा उत्सव ठरणार आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, नाशिक महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांनी देशांतर्गत तसेच विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एकात्मिक योजना आखली आहे. सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रॅण्डींग करण्यासाठी मोहिम राबविली जाणार असून युनेस्को आणि इन्क्रेडीबल इंडिया यांच्या सहकार्याने ग्लोबल कल्चरल हेरिटेज कॅम्पेनमध्ये नाशिकला स्थान मिळवून देण्याचे लक्ष्य असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दै. ‘पुढारी’ला दिली.
२०२६- २७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी शासनाने विशेष कायदा पारित करत स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरणाची निर्मिती केली आहे. या प्राधिकरणामार्फत सिंहस्थ कामांचे नियोजन, नियंत्रण, समन्वयन आणि अंमलबजावणी सुरू आहे. या कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकला जागतिक नकाशावर आणण्याची मोठी संधी आहे. त्यादृष्टीने कुंभमेळा मंत्री म्हणून महाजन यांनी नियोजन केले आहे. याअंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना घडविले जाणार आहे. या आगामी कुंभमेळ्यातून नाशिकला केवळ धार्मिक केंद्र नव्हे तर स्मार्ट स्पिरिच्युअल सिटी म्हणून जागतिक पर्यटन नकाशावर उभे करण्याची योजना आहे. त्याद्वारे पर्यटकांना तसेच भाविकांना पर्यटनाचा, तीर्थाटनाचा उत्तम अनुभव मिळेल, नाशिकचे स्थान सांस्कृतिक व धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर मजबुत होईल. संत-महंत, धर्मगुरूंच्या सहभागासोबतच विदेशी पाहुण्यांनाही आमंत्रण देता येऊ शकेल, असे कुंभमेळा मंत्री महाजन यांनी सांगितले.
नाशिकच्या ब्रॅण्डींगसाठी...
कुंभमेळा, त्र्यंबकेश्वर मंदिर, गोदावरी नदी, पंचवटी आणि वाईन टुरिझम यांचा एकत्रित प्रचार करणार.
विदेशी आणि देशांतर्गत पर्यटकांसाठी टेन्ट सिटी उभारणार.
गोदावरी किनाऱ्यावर लाईट ॲण्ड साऊंड शो, गोदावरी आरती.
कुंभमेळा संग्रहालयाच्या माध्यमातून कुंभमेळ्याचा इतिहास, छायाचित्रे, धर्म, विज्ञान आणि परंपरेचे एकत्रित प्रदर्शन.
कल्चरल परेड, हेरिटेज कॉरिडोर, ग्रीन बेल्ट, सार्वजनिक आरामगृहांची निर्मिती.
योगा फेस्टीव्हल, महिला स्वयंसहायता गटांसाठी फूड स्टॉल फेस्टीव्हल, हस्तकला बाजार
टुरिस्ट गाईड ट्रेनिंग, इंग्रजी, फ्रेन्च, जापनिज आदी भाषांचे प्रशिक्षण.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकचे आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅण्डींग केले जाणार आहे. युनेस्को आणि इन्क्रेडीबल इंडिया यांच्या सहकार्याने ग्लोबल कल्चरल हेरिटेज कॅम्पेनमध्ये नाशिकला स्थान मिळवून देण्याचे लक्ष्य आहे.
गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री.
ॲग्री, ॲडव्हेंचर टूरिझमचा समावेश
ॲग्री टूरिझम, ॲडव्हेंचर टूरिझम यांचा कुंभमेळ्यात समावेश करून नाशिक : द कप्म्लेट एक्सपेरिअन्स ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्याखेरीज सोशल मिडियाच्या माध्यमातून नाशिक कुंभमेळ्याचा वैश्विक दर्जा वाढविण्यासाठी डिजिटल मार्केटींगचे तंत्र अवलंबिले जाणार आहे.