लोकसभा निवडणुक 2024 : शेतकऱ्यांनी निवडणूक हाती घेत केला भास्कर भगरेंचा दिल्ली मार्ग सुकर

लोकसभा निवडणुक 2024 : शेतकऱ्यांनी निवडणूक हाती घेत केला भास्कर भगरेंचा दिल्ली मार्ग सुकर

[author title="नाशिक : वैभव कातकाडे" image="http://"][/author]
राज्यात दिंडोरी हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे शरद पवार नेहमीच सांगत आले होते. मात्र, गेल्या चार पंचवार्षिक निवडणूकांपासून हा सुरक्षित मतदारसंघ भाजपकडेच राहीला होता. २००८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून २००९, २०१४ मध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण तर २०१९ मध्ये भाजपच्या डॉ. भारती पवार निवडल्या गेल्या होत्या. यंदा मात्र शरद पवारांना मानणाऱ्या ग्रामीण जनतेने निवडणूक हाती घेऊन भास्कर भगरे यांच्या रुपाने हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या नावे केला.

वास्तविक याची सुरुवात झाली ती अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारांनी येवल्यामध्ये घेतलेली पहील्याच सभेपासून. या सभेमध्ये शरद पवारांनी मारोतराव पवार, अंबादास बनकर, श्रीराम शेटे, दत्ता पाटील, कल्याणराव पाटील, माणिकराव शिंदे, कोंडाजी आव्हाड या जुन्या गड्यांना सोबत घेतले. तेव्हा पासून सुरु झालेली सहानुभूती दिंडोरी लोकसभा मतदारसंघाने अद्याप कायम ठेवली असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांची उमेदवारी पहिल्याच टप्प्यात जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिक्षक असलेल्या भास्कर भगरेंच्या नावाला पसंती देण्यात आली. भगरे यांचे नाव दिंडोरीतील जेष्ठ सहकार नेते श्रीराम शेटे आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय पाटील यांनी समोर आणले. एकंदरीतच मतदारसंघात ही निवडणूक डॉ भारती पवारांबाबतचे नकारात्मकता आणि शरद पवारांचा करिष्मा या मुद्द्यावर लढली गेली. या मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी, नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपसाठी तर शरद पवारांनी चार सभा घेतल्या. सभेमध्ये शरद पवारांनी मतदान करण्याबाबत आवाहन करतानाच कांदाप्रश्नी चांदवड येथे केलेला रास्ता रोको, कांद्याबाबत केंद्रात मंत्री असताना घेतलेले निर्णय आदी बाबी मतदारांसमोर ठेवल्या.

पवारांना मानणारा मतदार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा नाशिक ग्रामीण मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यामध्ये दिंडोरी-पेठ, कळवण-सुरगाणा, निफाड चांदवला, येवला आणि नांदगाव या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये पक्षीय बलाबल बघता सर्वच सत्ताधारी महायुतीचे आमदार आहेत. अजित पवार गटाचे यात वजन असून दिंडोरी-पेठ, येवला, निफाड आणि कळ‌वण-सुरगाणा असे वर्चस्व आहे तर नांदगावमध्ये शिंदे गट आणि चांदवडमध्ये भाजपचे आमदार आहेत. तरी देखील महायुतीला फक्त नांदगाव आणि चांदवडमध्ये काहीशा फरकाने मताधिक्य मिळाले आहे. यामागे राष्ट्रवादीचे आमदार जरी अजित पवारांच्या सोबत गेले तरी येथील मतदार मात्र अद्याप शरद पवारांना मानणारा असल्याचे या निवडणूकीमधून समोर आले आहे.

गावितांच्या माघारीचा लाभ

निवडणूकीमध्ये आणखी एक महत्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे मार्क्सवादी नेते जीवा पांडू गावित यांच्या माघारीचा. कळवण मतदारसंघामध्ये जे पी गावित यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जे पी गावित यांनी सुरुवातीला उमेदवारी बाबत अनेक चर्चा केल्या होत्या. माकपचे राष्ट्रीय नेते सीताराम येचूरी यांच्यासोबत बोलून महाविकास आघाडीने मनधरणी सुरु केली होती. तरी देखील जे. पी. गावित यांनी अपक्ष अर्ज भरला होता. निफाडमधून जास्तीत जास्त मताधिक्य देणारे माजी आमदार अनिल कदम आणि निवडणूकीच्या उंबरठ्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेले शिरीषकुमार कोतवाल यांनी जे. पी. गावित यांची समजूत घालत जळगाव येथे शरद पवारांसोबत भेट घडवून आणली. त्यानंतर लगेचच गावितांनी माघारी घेत भगरेंना पाठिंबा दिला. जेपी गावितांच्या माघारीमुळे साधारणपणे एक लाखाहून अधिक मते भगरेंच्या वाट्याला आले. त्याचा परिणाम भगरेंचा दिल्लीचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news