

नाशिक : कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या अल्पवयीन मुलीने जिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिला. त्यामुळे तिच्या पतीवर भद्रकाली पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरातमध्ये ओळख झालेल्या तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर या मुलीने बाळाला जन्म दिला. प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिचे वय कमी असल्याचा प्रकार समोर आला. भद्रकाली पोलिसांनी नरेश शालिकराम राक्षे (रा. गणेशबाबानगर, नाशिक) याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेचे वय सध्या १७ वर्षे १० महिने असून, ती अनेक वर्षांपासून निराधार होती. काही वर्षांपूर्वी तिची ओळख सूरत येथे नरेश राक्षे या तरुणाशी झाली होती. ओळखीनंतर तो तिला नाशिकमध्ये घेऊन आला. दोघे गणेशबाबानगर येथील निर्माणाधीन सोसायटीत वॉचमन व मोलमजुरीचे काम करत होते. त्या काळात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालय पोलिस चौकीत नोंद करताना ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. मुलीने संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास करत पीडितेचा जबाब नोंदवला. राक्षे याला मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्याने शरीरसंबंध ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नवजात बाळावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. भद्रकाली पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.