नाशिक : दुसऱ्यासोबत फोनवर बोलते असा संशय घेत मैत्रीणीचा गळा दाबून भिंतीवर डोके आपटून एकाने खुन केला होता. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस जन्मठेप आणि १२ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तन्मय प्रवीण धानवा (२१, रा. ता. पालघर) असे आरोपीचे नाव आहे.
तन्मय याचे अर्चना सुरेश भोईर (२१, रा. बोईसर, जि. ठाणे) हिच्यासोबत मैत्री होती. अर्चना ही शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. १२ जानेवारी २०२१ रोजी मध्यरात्री तन्मय हा अर्चना राहत असलेल्या होस्टेलमध्ये गेला. तेथे तिला मारहाण करीत सोबत येण्यास धमकावले. त्यामुळे घाबरून अर्चना तन्मयसोबत गेली. तन्मयने जुने सीबीएस येथील हॉटेल सीटी प्राईड येथे रुम भाडेतत्वाने घेत अर्चनाला नेले. तसेच 'तु दुसऱ्यासोबत फोनवर बोलते' या संशयावरून वाद घालत अर्चनाला मारहाण केली. त्यात अर्चनाचा गळा दाबून भिंतीवर डोके आपटून तिचा खून केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तन्मय विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे डॉ. सुधीर कोतवाल यांनी युक्तीवाद केला. यात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा शाबित झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश एन. व्ही. जिवने यांनी तन्मय धानवा यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार माणिक पवार, सहायक उपनिरीक्षक के. के. गायकवाड, हवालदार गणेश चिखले यांनी कामकाज पाहिले.