

'Emergency period...' Different books tell us, everything about that time...!
संजीव कुळकर्णी
नांदेड : प्रदीर्घ काळ चाललेला भारतीय स्वातंत्र्यलढा, १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुढच्या काही महिन्यांपर्यंत हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी चाललेला संग्राम यांवर मराठीसह अन्य भाषांमध्ये हजारो पुस्तके प्रकाशित झाली. पुढे स्वातंत्र्याच्या २७ वर्षांनंतर देश पारतंत्र्यात गेला की काय, असे चित्र ज्या आणीबाणी पर्वाने निर्माण केले, त्या आणीबाणी पर्वाची समग्र माहिती देणारी तसेच या पर्वाचा यथोचित वस्तुनिष्ठ मागोवा घेणारी अनेक पुस्तके नव्या पिढीसाठी उपलब्ध आहेत.
२५ जून १९७५ हा स्वतंत्र भारतातील एक धक्कादायक दिवस. सध्याच्या राजवटीतील कर्तेघर्ते त्यास, 'काळा दिन' संबोधतात. वरील तारखेच्या दोन आठवडे आधी राजधानी दिल्लीमध्ये अनेक वेगवान व रहस्यमय घडामोडींची नोंद झाली आणि त्यातूनच आणीबाणी पर्व अव तरले. त्याला बुधवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. दिवंगत इंदिरा गांधी तेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या. केंद्रातील कॉंग्रेस पक्षाचे त्यांचे सरकार बहुमतात होते आणि देशाच्या बहुसंख्य राज्यांमध्ये याच पक्षाची सत्ता होती. नांदेडच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे याच भूमीतील शंकरराव चव्हाण तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
आज जे वाचक-नागरिक वयाच्या चाळिशी ते साठीदरम्यान आहेत, त्यांना आणीबाणीनंतरच्या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांतून, अभ्यासातून आणीबाणी पर्वाचे चांगले आकलन झाले; पण ज्यांचा जन्म चालू शतकाच्या आरंभी झाला त्यांना या पर्वाची माहिती मिळविण्यासाठी मराठी व अन्य भाषेतील पुस्तकांसह आधुनिक माध्यमांचाही एक पर्याय आहे. तथापि अनेक पुस्तकांतील माहिती विश्वसनीय आणि तपशील पुरवणारी असल्याचे मानले जाते.
तत्कालीन केंद्र सरकारच्या प्रसिद्धी विभागाने आणीबाणी लागू करण्यामागची पार्श्वभूमी कथन करणारी पुस्तिका इंग्रजीसह सर्वच भारतीय भाषांमध्ये जारी केली होती. महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क विभागानेही तेव्हा 'आणीबाणी कशासाठी?' हे पुस्तक प्रकाशित करून राज्यभर त्याचे वितरण केले होते.
आणीबाणी पर्वाशी त्या काळातील सर्व राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांच्यासह लेखक, विचारवंत, पत्रकार आणि विचारी नागरिकांचा, दुसऱ्या पातळीवर नोकरशाहीचा थेट संबंध आला. त्यांतील अनेकांनी वेगवेगळ्या कालखंडात आपल्या लेखनातून आणीबाणी पर्वाचा मागोवा घेतला. कोणी अनुभव कथन केले, तर कोणी विश्लेषण केले. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनी आपल्या चरित्र आत्मचरित्रातून त्या काळातील वेगवेगळ्या प्रसंगांची नोंद केली, असे काही निवडक पुस्तके चाळल्यानंतर लक्षात येते.
भारतीय राजकीय नेत्यांपैकी महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, यांच्यानंतर इंदिरा गांधींवरच विपुल लेखन झाले. त्यांच्यावरील महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये पुपुल जवकर यांनी लिहिलेले 'इंदिरा गांधी' हे चरित्र, पी.एन.धर यांचे 'इंदिरा गांधी: आणीबाणी व भारतीय लोकशाही', बी.एन. टंडन यांचे 'चाहुल आणीबाणीची', पी.सी. अलेक्झांडर यांचे 'इंदिरा अंतिम पर्व' (या चारही पुस्तकांचा मराठी अनुवाद अशोक जैन) तसेच माजी सनदी अधिकारी दिवंगत माधव गोडबोले यांचे 'इंदिरा गांधी एक वादळी पर्व' हे दीर्घ विश्लेषण, इत्यादींचा समावेश असून ही सर्व पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत.
गेल्या शतकाच्या उत्तरार्धातील वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते, आणीबाणीच्या आधीच्या आणि नंतरच्या कालखंडातील वरिष्ठ अधिकारी, देशी-विदेशी पत्रकार, आदींनी आणीबाणीच्या कालखंडातील घटना घडामोडीची माहिती आपापल्या आठवणी आणि आकलनातून उघड केली. महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आपले राजकीय चरित्र लिहिले नाही. आणि नंतरच्या काळात त्यांच्यावर विस्तृतपणे लिहिणाऱ्यांनीही आणीबाणीतील घटना घडामोडी विस्ताराने शब्दबद्ध केलेल्या नाहीत.
युक्रांदचे संस्थापक, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांच्या 'येरवडा विद्यापीठातील दिवस' या आत्मकथेत आणीबाणी दरम्यान महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या तसेच येरवडा कारागृहातील घटना-प्रसंगांची बरीच माहिती वाचायला मिळते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या हिंदीतील चरित्राचा मराठी अनुवाद गतवर्षी प्रकाशित झाला. आणीबाणी लागू होताच चंद्रशेखर यांना झालेली अटक आणि कारागृहातील त्यांचे अनुभव या चरित्रात वाचायला मिळतात. राज्याचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार आणीबाणी काळात शंकररावांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मकथेत आणीबाणीसंबंधी 'व्यापून राहिलेली अस्वस्थता' या शीर्षकाखाली अवघ्या तीन पानांचे प्रकरण आहे. त्यात काही महत्त्वाची निरीक्षणे वाचायला मिळतात.