
दिंडोरी (नाशिक) : तालुक्यातील कोचरगाव येथे प्रातर्विधीसाठी गेलेल्या वामन नाना लिलके (४७) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. झाडाझुडपात लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप घालून त्यांना जखमी केले.
लिलके यांच्या आवाजाने परिसरातील शेतकरी व रस्त्याने जाणारे सोमनाथ लिलके, विठ्ठल लिलके आदी धावून आले. त्यांनी वामन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता, बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. यात काहींना हातावर, मांडीवर चावा घेतला असून पाठीवर व पोटावर पंजांनी जखमा केल्या आहेत. जखमींना तत्काळ कोचरगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक संतोष सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे यांनी वनरक्षक, वनसेवकांसह घटनास्थळी धाव घेतली. ग्रामपंचायत सदस्य आणि पोलिसपाटील यांनीही घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील शेतकरी व शेतमजुरांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
घटनास्थळी पडीक शेत क्षेत्र सुमारे 10 ते 12 एकरांचे असून, बिबट्या अद्याप त्या भागातच लपून बसल्याची शक्यता आहे. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.