
दिंडोरी (नाशिक) : तालुक्यातील वनारवाडी गावालगत धामण नदीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात रविवार (दि. १५) मादी बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यास वनरक्षकांनी ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद झाले असून तालुक्यातील कादवा कारखाना परिसरातील वसाहतीत नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला आहे.
या परिसरात बिबट्यासह दोन बछडे आहेत. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. दिंडोरी परिसरातील जाधव वस्तीवर एक व वनारवाडी शिवारात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री घराबाहेर पडणे टाळत आहेत. या बिबट्यांना वनविभागाने लवकरात लवकर पकडून दूर जंगलात सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल ५० दिवसांनी नर बिबट्याला वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले.
वनारवाडीच्या चव्हाण वस्ती परिसरात मागील महिनाभरापासून नर बिबट्याचा वावर होता. तो वारंवार दर्शन देत होता, मात्र पिंजऱ्यात अडकत नव्हता. वनविभागाने सातत्याने शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर तो नर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. या मोहिमेत ग्रामस्थांनी संयम राखून वनविभागाला सहकार्य केल्यामुळे यश मिळाले.
यापूर्वी जाधव वस्ती परिसरातही चारवर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाने त्या भागातूनही बिबट्या जेरबंद केला होता. आतापर्यंत दोन बिबटे पकडण्यात आले असले, तरी दिंडोरी, पालखेड, निळवंडी, मडकीजांब आणि वनारवाडी परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पकडण्यात आलेले बिबटे दूर जंगलात सोडावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जेणेकरून नागरिकांच्या जीविताला धोका होणार नाही आणि शेतीकामे सुरक्षितपणे करता येतील.
परिसरात बिबट्यांची संख्या अधिक असल्याने सर्वांनी शेतीकामे करताना सजग राहावे. वनारवाडी, दिंडोरी, मडकीजांब, हातनोरे, निळवंडी परिसरात बिबटे जेरबंद करण्याचे प्रयत्न वरिष्ठांच्या निर्देशांनुसार सुरू राहणार आहेत.
अशोक काळे, क्षेत्र अधिकारी, वनविभाग दिंडोरी.