

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
दारणाकाठच्या बेलतगव्हाण परिसरात बिबट्या नागरी वस्तीत मुक्तपणे संचार करत असून, लगतच्या लॅम रोडवर पहाटेच्या सुमारास फिरावयास जाणाऱ्या नागरिकांनाही निदर्शनास पडल्याने रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी दारणाकाठाच्या परिसरात तीन बिबटे जेरबंद झाल्यानंतर बिबट्याचे अस्तित्व पुन्हा दिसू लागल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांसमोर संकट उभे राहिले आहे. नदीकाठी असलेल्या दाट झाडीमध्ये बिबट्याने आपला मुक्काम ठोकला असून, रात्रीच्या सुमारास बिबट्या मळे विभागात सर्रासपणे फिरताना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे.
धीरज पाळदे यांच्या बंगल्याच्या परिसरात बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये दिसला. बिबट्याने गेल्या दोन दिवसांत या परिसरातील कुत्रे व इतर पाळीव प्राणी यांना लक्ष केलेले आहे. एका कॉलनीमध्ये बिबट्या चारचाकी व दुचाकीच्या मधून जाताना स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर निघणे धोक्याचे झाले आहे. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी माजी सरपंच शरद पाळदे, माजी उपसरपंच प्रतिभा कातोरे, रवींद्र दोंदे, धीरज पाळदे, धनाजी धुर्जड, दीपक पागिरे, विशाल वाघ, आप्पा गाढवे आदींनी केली आहे.
सॅनिटोरियममध्ये मुक्काम
देवळाली कॅम्पच्या लॅम रोड परिसरात भैरवनाथ मंदिर लगतच्या कलावती सॅनिटोरियममधून बिबट्या पहाटे साडेचारच्या सुमारास निघून समोरच्या भाटिया सॅनिटरीमध्ये जाताना प्रकाश खातळे व सहकाऱ्यांनी बघितला. उन्हाचा कडाका वाढल्याने आणि शेताचा हंगाम संपल्याने बिबटे पुन्हा शहराकडे वळू लागले आहेत. त्याची पहिली झलक लॅम रोडवर पाहायला मिळाली. लॅम रोड परिसरात दाट झाडीमुळे गारव्यासाठी बिबटे तेथे दाखल झाले आहेत. झाडांमुळे त्यांना सहज लपता येत आहे.