

सातपूर : पुढारी वृत्तसेवा
सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात शनिवारी सकाळी बिबट्याच्या एन्ट्रीने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले. प्रभाग क्र. ९ मधील ध्रुवनगरच्या संत तुकाराम महाराज गार्डन परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने संपूर्ण भागात एकच खळबळ उडाली. सकाळी १० च्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या जागेवरील कामगारांना एका खोलीत शांतपणे बसलेला बिबट्या दिसून आला.
ही माहिती क्षणार्धात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रहिवासी भागात बिबट्या शिरल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. त्यामुळे बचावकार्य अधिकच आव्हानात्मक बनले. गार्डन परिसरात दाट झाडीझुडपे आणि अडथळ्यांमुळे बिबट्याचा माग काढणे अवघड ठरत होते. त्यामुळे प्रशासनाने अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले.
जवळपास ३ तास सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये बिबट्या झुडपांमध्येच लपून बसल्याने शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. यानंतर जेसीबीच्या सहाय्याने झुडपे हटवून परिसर मोकळा करण्याची रणनीती राबवण्यात आली. मात्र, हालचालीदरम्यान बिबट्याने अचानक जागा बदलत श्री स्वामी रो बंगलो परिसरात धाव घेतली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा होत असल्याने वन विभागाच्या पथकाला अडथळे येत होते. तरीही संयम राखत आणि योग्य नियोजन करत अखेर वनविभागाने डार्ट गनचा वापर करत बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.
या संपूर्ण थरारक कारवाईदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी दिनकर पाटील आणि अमोल पाटील घटनास्थळी उपस्थित होते. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी टळली असली तरी या घटनेने शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या कारवाईत वनपरिक्षेत्राधिकारी सुमित निर्मल, सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार, वनपाल अनिल अहिरराव, संकेत गायकवाड, रेस्क्यू टीमप्रमुख अभिजित महाले यांचा सहभाग होता. वैद्यकीय पथकाचे डॉ. हेमराज यांनी बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध केले. संबंधित बिबट्या अंदाजे सव्वा वर्षाचा असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
त्यानंतर त्याला सुरक्षितपणे म्हसरूळ येथील जीवरक्षक केंद्रात हलवण्यात आले. यावेळी गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.
नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज
नाशिकसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहर परिसरातील जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभाग आणि नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
ठोस उपाययोजना करणे आवश्यक
सातपूरमधील ही घटना केवळ एक अपघाती प्रसंग नसून शहर आणि वन्यजीव यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाचे उदाहरण आहे. वेळेवर केलेल्या कारवाईमुळे अनर्थ टळला असला, तरी भविष्यात अशा घटनांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.