

Leopard Falls In Well
देवळा : देवळा तालुक्यातील खालप गावात शनिवारी दि. १९ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास विहिरीत बिबट्या पडल्याची थरारक घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की खालप ता देवळा येथील शेतकरी कैलास रामचंद्र पवार यांना त्यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचा आवाज आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने देवळा वनविभागाशी संपर्क साधला.
घटनेचे गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव वनपाल प्रसाद पाटील, वनरक्षक सुवर्णा इकडे, विजय पगार यांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी अत्यंत कुशलतेने पिंजरा लावण्याची मोहीम राबवली. गावकऱ्यांच्या मदतीने आणि दक्षतेने अखेर त्या बिबट्याला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढून त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
सदर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यानंतर त्याला सुरक्षित जंगलात हलविण्यात येणार आहे. या घटनेमुळे खालप गावासह परिसरात एकच खळबळ उडाली होती, मात्र वनविभागाच्या तत्परतेने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून देवळा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी व कोणतीही घटना घडल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.