Girishbhau Mahajan : गिरीश भाऊ… असे नका बिबट्यामागे धावू…!

सह्याद्रीचा माथा ! धाडस छान, परंतु धोका आणि निर्णय यांच्यातील सीमारेषा धुसर
नाशिक
बिबट्यास जेरबंद करण्याचा प्लॅन सफल करताना मंत्री गिरीश महाजन(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक, डॉ. राहुल रनाळकर

भाऊ, आपल्या उत्साहाचे, धाडसाचे, जिद्दीचे, उर्मीचे आणि सार्वजनिक जीवनातील झपाटलेपणाचे आम्ही शतशः चाहते आहोत. आपण मंत्री असो वा साधा कार्यकर्ता, आपल्या मनातील ती एकदा काहीतरी करायचे असलेली हुरहुर कौतुकास्पद अशीच आहे… आपली बिबट्याची मोहीम महाराष्ट्रातील तरुणांसाठी पुन्हा प्रेरणादायी ठरत आहे. पण म्हणतात ना, “धाडस छान, परंतु धोका आणि निर्णय यांच्यातील सीमारेषा फारच धुसर असते” आणि म्हणूनच हे पत्र प्रेमाच्या, काळजीच्या आणि वास्तवाच्या जाणीवेतून लिहित आहे.

गिरीशभाऊ महाजन

सर्वप्रथम नमस्कार!

साहेब… परत एकदा आपण ‘बिबट्या मोहीमे’वर गेलात आणि मोहिम फत्ते देखील केली!

नाशिक शहरातील उच्चभ्रू अशा महात्मा नगरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुदैवाने आपण त्यावेळी नाशिकमध्ये असल्याची पूर्वसूचना बिबट्याला आधी मिळाली नसेल, अन्यथा त्याने इथे यायचे नक्कीच टाळले असते. जशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली तसे आपण आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून तातडीने बिबट्यास जेरबंद करण्याचा प्लॅन आखाल हे आम्ही आधीच गृहीत धरले होते. आपण योग्य त्या सूचना द्याल, प्रशासन सांभाळाल, अधिकारी तयार ठेवाल, इथपर्यंतही ठीक! मात्र आपण स्वतःच बिबट्याच्या शोधमोहीमेत हिरीरीने सामील व्हाल, हा धक्का आणि आश्चर्य दोन्हीचा एकत्रित अनुभव आमच्यासाठी नक्कीच होता.

चाळीसगावच्या घटनेला आठ वर्षे झाली, तेव्हा पिस्तूल हातात घेऊन जंगलात घुसलेले आपण अजूनही आमच्या डोळ्यांसमोर आहात. म्हणतात ना, आठवणी कधीच वृद्ध होत नाहीत! महात्मा नगरातील बिबट्याबाबत देखील आपण ज्याप्रमाणे ॲक्शन मोड मध्ये उतरलात, तो तोच जुना जोश घेऊन! वयाच्या पासष्टीच्या उंबरठ्यावर आपण अजूनही तरुणांना लाजवाल अशा अंदाजात धावताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला...पण बऱ्याच जणांना माहित नाही, की आपल्या कारमध्ये डंबेल्स असतात, आणि वेळ मिळाला की आपण व्यायामाला प्राधान्य देतात...

आणि म्हणूनच मनात येते, ते म्हणजे “भाऊ, एवढा उत्साह तुम्ही कसा बरे टिकवून ठेवला आहे?” हे प्रश्‍न प्रेरणादायी आहेत, टीकेचे नाही. पण त्याचवेळी काही वास्तव आणि जबाबदाऱ्या देखील महत्त्वाच्या आहेत, असे आम्हाला वाटते.

नाशिक
Leopard Attack in Nashik : नाशिकला भरवस्तीत बिबट्याचा धुमाकुळ; सात जणांवर हल्ला

ही धाव म्हणजे धाडस? की धोका?

गिरीशभाऊ, बिबट्या हा वन्यप्राणी. “क्यूट” नव्हे, तर तो क्षणात आक्रमक होणारा आहे. आपण उत्तर महाराष्ट्रापुरते बॉस पण हा जंगलातील बॉस आहे. त्याला फ्लॅश, सायरन, कॅमेरे, माईक, पोलिसांचा ताफा काहीही आवडत नाही. आणि हा प्राणी भीतीमधून कधीही अत्यंत आक्रमक होऊ शकतो.

आपण या मोहिमेवर जाता, तेव्हा —

  • अधिकारी तणावात

  • वनविभाग कर्मचाऱ्यांची त्रेधा

  • पोलिसांचा प्रचंड ताफा

  • दुसरीकडे कार्यकर्त्यांचा जल्लोष

  • मोबाईलवर LIVE शोधत बसणारी मंडळी, ती वेगळी

  • हे तेव्हाचे वातावरण रेस्क्यूचे न वाटता अत्यंत ताणाचे बनले होते. आपल्याला जीवाची तमा नसली तरी

आमच्यासाठी आपला जीव अमूल्य !!

आपण केवळ मंत्री नाही, आपण भारतीय जनता पक्षाच्या राजकीय भट्टीतून तयार झालेले अनुभवी नेते आहात. कुंभमेळ्याची मोठी जबाबदारी असलेला नेता म्हणून आपल्याकडे सगळ्या देशाची नजर आहे. मुख्य निर्णय प्रक्रियेतील आपण केंद्रबिंदू आहात. सगळ्याच महत्त्वाचे म्हणजे नाशिकसाठी भविष्याच्या आशा आपल्यावर टिकलेल्या आहेत.

भाऊ, हे काम तर “वनविभागाचे” आहे, “वाघ्या भाऊंचे” नव्हे!

वनविभागातील अधिकारी, रेस्क्यू टीम, ट्रॅकर, ट्रॅन्क्विलायझर, सापळे, ड्रोन, नाईट व्हिजन, सेन्सर सर्व व्यवस्था शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार ठेवली होती. या टीमकडे अनुभव, कौशल्य, प्रशिक्षण, संयम हे सगळंच एकवटलेलं आहे. मात्र, आपण त्या परिसरात पोहोचलात आणि आपण, बिबट्या आणि जमलेले लोक ही सगळीच सरमिसळ होऊ पाहत होती. म्हणून भाऊ "धाडसाचे नेतृत्व हिताचे, पण धोक्याचे नेतृत्व घातक!" असेच आपल्याला सांगावेसे वाटते.

प्रश्न बिबट्याचा नव्हे जंगलाच्या मौनात लपलेल्या वेदनेचा !

आज महाराष्ट्रात शहरांच्या हद्दीत, ग्रामीण भागात, फॅक्टरी परिसरात, द्राक्षबागांमध्ये, केळीबागांमध्ये, उसाच्या शेतात महामार्गांजवळ बिबटे वारंवार दिसू लागले. ते “शहरात येत आहेत” असे आपण म्हणतो,

पण वास्तव असे आहे...की “आम्हीच जंगलात घुसत आहोत.” मानवी विस्तारामुळे वनक्षेत्र कमी, खाद्यसाखळी खंडित, पाणीस्रोत आणि निवारा घटला की वन्यप्राणी शहरी सीमेकडे वळतात ते दोषी नाहीत, परिस्थिती दोषी आहे.

नाशिक
Leopard Panther Difference | बिबट्या आणि पँथरमध्ये काय फरक आहे?

भाऊ, तात्पुरता नव्हे — शाश्वत उपाय हवा!

या गंभीर विषयावर उपाययोजना काय असायला हव्यात, याची आखणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात खाली काही महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी करत आहे.

स्वतंत्र अध्ययन समिती स्थापन करता येईल का, हे अग्रक्रमाने पाहायला हवे. त्यात पर्यावरण, प्राणी शास्त्रज्ञ, वनतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शहररचना तज्ज्ञ, भू-सर्वेक्षण अधिकारी, हवामान तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश असावा. त्यासोबत मानवी-वनीकरण सेफ झोन नकाशा तयार करायला घ्यावा. जेणेकरुन भविष्यातील विकास आराखड्यात वन-प्रवेश प्रतिबंध सीमारेषा बंधनकारक करता येणे शक्य होईल.

आपण आपत्ती व्यवस्थापन खात्याचेही मंत्री आहात. बिबट्यांची समस्या आपल्याकडे सोपवावी, यासाठी आपण मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करणार असल्याची बातमी आमच्यापर्यंत येवून धडकली आहे. त्यामुळे सध्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात वन्यजीव घटकांचा समावेश नाही. यापुढील काळात आपत्ती व्यवस्थापनात वन्यजीव घटकाचा स्वतंत्र विभाग केल्यास या समस्येकडे वरवर न पाहता सखोल विचार करुन उपाययोजना निश्चितपणाने आखता येऊ शकतील. यातून Wildlife Disaster Protocol देखील विकसित करणे शक्य होऊ शकेल. वन कर्मचाऱ्यांना पुरेसे कारवाईचे अधिकार आणि तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे दिल्यास त्यांची कार्यक्षमता अधिक वाढण्यात मदत होईल. पुढे जात ग्रामीण व शहरी सीमेवरील नागरिकांना शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली तर जनप्रबोधनातून जनभागीदारीही वाढेल.

भाऊ… आता हव्या ठोस उपाययोजना

बिबट्याच्या मागे धावण्याच्या आपल्या क्रियेला विरोधक स्टंट म्हणतात. पण आम्ही तसे मानत नाही. आपल्या रक्तात धाडस आणि अॅड्रेनालिन अर्थात काहीतरी सतत नवीन करण्याची खुमखुमी आहे हे कौतुकास्पद म्हणायला हवे. पण भाऊ, परफॉर्मन्स आणि पॉलिसी यात फरक आहे. घटनास्थळी धाव घेणे हे आकर्षक आणि क्षणिक आहे. पण दशकानुदशके परिणाम करणारी धोरणे हीच खरी नेतृत्वाची शाश्वत ओळख ठरतात.

संकटमोचक, आता व्हा “वनांचे संकटमोचक” !

पंतप्रधान मोदींनी चित्त्यांना पर्यावरण पुनर्वसनाच्या दृष्टीने स्थापित केले.

आपण महाराष्ट्रासाठी बिबट्या–मानव सहअस्तित्वाचे मॉडेल तयार करू शकता.

आपण

• राजकीय मोहीम चालवू शकता

• प्रशासन हलवू शकता

• निधी आणू शकता

• राष्ट्रीय धोरण तयार करण्यासाठी दिल्ली हलवू शकता

आणि म्हणूनच, आम्हाला बिबट्या मागे धावणारा नेता नको, बिबट्यांचेही भविष्य सुरक्षित करणारा ‘नीतीधारक’ नेता हवा आहे.

भाऊ,

हे पत्र रागातून नाही,

रोषातून नाही,

टिप्पणीसाठी नाही,

खरी काळजी आणि आदरातून लिहित आहे.

आपण धाडसी आहात, हे महाराष्ट्र मान्य करतो, आम्ही अनेकदा ते पाहिले आहे.

पण धाडसाने निर्माण झालेला आदर, विवेकाने टिकवला पाहिजे.

कुंभमेळ्याच्या विशाल जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर आहेत.

आणि म्हणून आपले आरोग्य, सुरक्षा आणि नेतृत्व आमच्यासाठी अमूल्य आहे.

आम्ही आपल्यावर प्रेम करतो,

आदर करतो, विश्वास ठेवतो

आणि म्हणूनच विनंती करतो

गिरीश भाऊ… आता केवळ बिबट्याला न पकडता, त्याचेही संकटमोचक आपण व्हावे, हीच इच्छा !!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news