

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे कांद्याचे पीक वाचवण्यासाठी टँकरने पाणी आणण्याची धडपड, तर दुसरीकडे बाजारपेठेत दराची घसरण, अशा दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. मेहनत, पैसा आणि पाण्याची कसरत करून उभे केलेले कांद्याचे पीक सध्या दराच्या घसरणीमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने कांद्याच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे.
कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या कमाल दरात प्रतिक्विंटल सुमारे १,४१९ रुपये, तर सरासरी दरात १,१०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवरही परिणाम होत असून, त्याचा फटका देशांतर्गत बाजारभावाला बसत असल्याचे कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी सांगितले. दि. १८ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ५,७०० रुपयांचा दर मिळाला होता.
मात्र, आठवडाभरातच या दरात मोठी घसरण होऊन या आठवड्यातील मंगळवारी कमाल दर ४,२८१ रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी मोठा खर्च आणि पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटांना सामना करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता व अडचणी आणखी वाढल्या आहेत.
सात एकर लाल कांद्याची लागवड केली होती. मात्र, पाण्याअभावी पाच एकरांतील पीक सोडून द्यावे लागले. दोन एकरांतील कांदा टँकरच्या पाण्यावर जगवला. गेल्या आठवड्यात कांद्याला ४,९०० रुपये दर मिळाला होता. त्याच कांद्याला अवघा ३,५०० रुपये भाव मिळाला. आठ दिवसांत १,४०० रुपयांची घसरण झाली. यातून शेतीचा खर्च कसा भागवायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न आहे.
- अजित गाडे, कांदा उत्पादक शेतकरी, तळेगाव रुई, ता. चांदवड.