

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
मॉरिशसला कांदा निर्यात करण्याबाबत नुकतीच करण्यात आलेली घोषणा ही नवी बाब नसून नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह परिसरातून गेल्या चार ते पाच दशकांपासून मॉरिशसला कांद्याची निर्यात सुरू आहे,
असे मत व्यापारी व कांदा बाजाराशी संबंधित जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या संदर्भात करण्यात आलेली घोषणा शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याची चर्चा बाजारपेठेत सुरू आहे.
अपेडाच्या आकडेवारीनुसार दरवर्षाला कांदा हा मॉरिशसला निर्यात होते. साधारणतः वर्षाकाठी १८ ते २० कोटी रुपयांचे परकीय चलनदेखील आपल्याला यातून मिळते. मॉरिशससह श्रीलंका तसेच मध्यपूर्वेतील काही देशांत अनेक वर्षांपासून येथील कांद्याची निर्यात होत आहे. त्यामुळे अलीकडे करण्यात आलेली घोषणा ही नवा निर्णय असल्याचा भास निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया कांदा निर्यातदार प्रवीण कदम यांनी व्यक्त केली.
युद्धजन्य परिस्थितीमुळे बंदरांवर शेकडो कांदा कंटेनर अडकले आहेत. ज्यामुळे कांदा खराब होत असून, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. वाहतूक खर्चात वाढ झाली असून, आखाती देशांसाठीचा शिपिंग खर्च ६०० डॉलरवरून ६००० डॉलरपर्यंत वाढला. याचा थेट परिणाम व्यापारावर आणि कांद्याच्या बाजारभावावर होत आहे.
पणन राज्यमंत्र्यांनी मॉरिशसला १ लाख टन कांदा निर्यात होणार असल्याचे सांगितले. परंतु, हे विधान दिशाभूल करणारे आहे. अपेडाच्या माहितीनुसार मॉरिशस गेल्या ४० ते ५० वर्षांपासून भारताकडून कांदा आयात करत आहे.
- प्रवीण कदम, निर्यातदार, लासलगाव