

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरात गेल्या एक महिन्यापासून गॅस वितरण पुरवठा ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे अनेक कुटुंबांचे स्वयंपाकाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. जाधव गॅस एजन्सीला संबंधित गॅस कंपनीकडून वेळेवर पुरवठा होत नसल्याने ही समस्या तीव्र झाली आहे.
नागरिकांनी नियमितपणे गॅस सिलिंडरचे बुकिंग करूनही त्यांना वेळेत सिलिंडर मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, बुकिंगनंतर गॅस सिलिंडर घरपोहोच न देता थेट गोदामामध्ये येऊन सिलिंडर घेण्याचा अट्टहास एजन्सीकडून केला जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. वृद्ध, महिला तसेच कामगार वर्गाला गोदामापर्यंत जाणे शक्य नसल्याने त्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात गॅसचा साठा नसल्याने बुकिंगची प्रतीक्षा कालावधीही वाढत चालली आहे. काही ग्राहकांचे बुकिंग २० ते २५ दिवस उलटूनही प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित गॅस कंपनीने आणि एजन्सीने तातडीने पुरवठा सुरळीत करावा, घरपोहोच वितरण पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी होत आहे. प्रशासनानेही या प्रकरणात लक्ष घालून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विंचूरमध्ये हॉटेलात घरगुती सिलिंडरचा वापर विंचूर :
परिसरातील हॉटेल, खानावळ व उपहारगृहांत नियमबाह्य पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना गॅस सिलिंडर मिळण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरल्याने सध्या परिसरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. वेळेवर सिलिंडर न मिळाल्यामुळे अनेकांना बाहेरून अन्न मागवावे लागत आहे.
लाकडासह स्टोव्हचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहे. नियमानुसार हॉटेल व्यावसायिकांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरणे बंधनकारक आहे. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर कायद्याने गुन्हा ठरत आहे. पुरवठा विभागासह गॅस कंपन्यांनी याबाबत कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, परिसरात अद्याप प्रभावी तपासणी व ठोस कारवाई होत नाही.
गेल्या 66 महिनाभरापासून गॅससाठी वणवण करावी लागत आहे. वेळेवर बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नाही. घरपोहोच सेवा बंद करत थेट गोदाममध्ये येण्यास सांगितले जाते.
दिलीप सोनवणे, ग्राहक
आमच्याकडून जाणूनबुजून कोणतीही अडचण निर्माण केली जात नाही. गॅस कंपनीकडून अपेक्षित प्रमाणात व वेळेवर पुरवठा होत नसल्यामुळे वितरणावर परिणाम झाला आहे. -
जयवंतराव जाधव, संचालक, गॅस एजन्स