

नाशिक : आसिफ सय्यद
महापालिकेच्या निवडणुकीत १२२ पैकी सर्वाधिक ७२ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवित सलग दुसऱ्यांदा महापालिकेची एकहाती सत्ता काबीज करणाऱ्या भाजपला ३५,४० टक्के मते मिळाल्याची माहिती पक्षनिहाय मतांच्या विश्लेषणातून समोर आली आहे. मतांचे मोठ्या प्रमाणावर विखुरलेपण असतानाही भाजपची संघटनात्मक ताकद, शिस्तबद्ध प्रचारयंत्रणा आणि प्रभागनिहाय प्रभावी रणनीती निर्णायक ठरली ठरल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
मतांची टक्केवारी लक्षात घेता, मतदारांच्या पसंतीत शिवसेना (शिंदे गट) दुसऱ्या, तर शिवसेना (उबाठा) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महापालिका निवडणुकीसाठी १३ लाख ६० हजार ७२२ मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी ७ लाख ७१ हजार १३२ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ५६.६७ टक्के इतकी होती.
चारसदस्यीय प्रभाग रचनेनुसार एका मतदाराला चार मते देण्याचा अधिकार असल्यामुळे निवडणूक रिंगणातील ७३५ उमेदवारांना तब्बल ३० लाख ३५ हजार ०५३ मते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणांच्या साहाय्याने दिली गेली, या निवडणुकीत मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. अनेक पक्ष, अपक्ष आणि नोटा यामुळे मतदारांचा कौल विभागला गेला. मात्र अशा परिस्थितीत भाजपने प्रभागनिहाय मतांची एकजूट साधत निर्णायक आघाडी घेतली.
चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत संघटित पक्षालाच फायदा होतो, हे या निकालातून पुन्हा स्पष्ट झाले. नाशिक महापालिकेचा निकाल हा स्थिर प्रशासन, स्पष्ट नेतृत्व आणि निर्णायक कारभाराचा कौल मानला जात आहे. भाजपकडे आता पूर्ण बहुमत असल्यामुळे शहराच्या विकासासंदर्भात वेगवान निर्णय घेण्याची संधी भाजपला उपलब्ध झाली आहे. संघटन, रणनीती आणि सातत्य असेल, तर बहुपक्षीय रणांगणातही सत्ता निश्चित होते, हे भाजपने या निवडणुकीतून दाखवून दिले. शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
मतांचे प्रमाण भाजपच्या तुलनेत कमी असले, तरी संघटित मतदारांचा फायदा पक्षाला मिळाल्याचे दिसते. उबाठाला तिसऱ्या क्रमांकाची मत टक्केवारी मिळाली. मर्यादित जागांमध्येही मताधार टिकवून ठेवण्यात पक्ष यशस्वी ठरला. २०८ अपक्ष उमेदवार असूनही मोठ्या प्रमाणावर मते विभागली गेली. संघटित ताकद नसल्याने अपक्ष मतांचे जागांमध्ये रूपांतर झाले नाही.