

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
ऐन सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना वणवण करावी लागत असून, गॅस एजन्सीच्या ढिसाळ कारभाराविरोधात लासलगाव शहर विकास समितीने ढोल बजाव आंदोलन करून निषेध करण्यात आला. ऑनलाइन बुकिंग करून १० ते १५ दिवस, तर काही ग्राहकांना १५ ते २० दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
घरपोच वितरण सेवा विस्कळीत झाल्याने गृहिणींचे स्वयंपाकाचे नियोजन कोलमडून असून, एजन्सीच्या कारभारात तातडीने सुधारणा करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
गॅस सिलिंडरची ऑनलाइन नोंदणी करूनही वेळेत वितरण होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या जात आहेत. काही ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंट करूनही सिलिंडर मिळत नसल्याचे सांगितले.
एजन्सीकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहकांना वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात पर्यायी वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात प्रशासन आणि संबंधित यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी केला. सहस्रसह परिसरातील ग्राहकांची गैरसोय दूर करून घरपोच सिलिंडर वितरण तातडीने सुरळीत करावे, अशी मागणी शहर विकास समितीने केली आहे. बुधवार (दि. २८) पर्यंत ग्राहकांना सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जाधव गॅस एजन्सीच्या अनियमित गॅस वितरणामुळे ग्राहकांना १० ते १५ दिवस बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहेत. कंपनीकडून एजन्सीचा सिलिंडर पुरवठा बंद झाल्याची माहिती तपासणीदरम्यान समोर आल्यानंतर ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना जवळच्या एचपी गॅस एजन्सीशी तात्पुरते जोडून नियमित सिलिंडरपुरवठा करण्याची मागणी तहसीलदार निफाड यांनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) प्रादेशिक कार्यालयाकडे केली आहे.
याबाबत तातडीने उपाययोजना करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याची पात्रात नमूद केले आहे. तहसीलदारांच्या पत्रानुसार, बुधवार (दि. २९) पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक यांनी जाधव गॅस एजन्सीला भेट देऊन तपासणी केली. यावेळी एजन्सीचे व्यवस्थापक सागर बनमळून उपस्थित होते. गॅस सिलिंडर वितरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जाधव गॅस एजन्सीकडे गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना बुकिंग केल्यानंतरही १० ते १५ दिवस सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे दूरध्वनीद्वारे केल्या आहेत. या समस्येबाबत दैनिक 'पुढारी' मधूनही वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
दिवाळीच्या तोंडावर लासलगाव परिसरातील घरगुती गॅस सिलिंडर वितरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जाधव गॅस एजन्सीकडे गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना बुकिंग केल्यानंतरही १० ते १५ दिवस सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे दूरध्वनीद्वारे केल्या आहेत. सणासुदीच्या काळात निर्माण झालेल्या गॅसटंचाईमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, संबंधित वितरकाबाबत नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याची पत्रात नमूद केले आहे.
या पत्राची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथील पुरवठा शाखेला माहितीस्तव पाठवली आहे. या प्रकरणात आता एचपीसीएल प्रशासन काय निर्णय लेते आणि लासलगावमधील ग्राहकांचा सिलिंडर पुरवठा किती लवकर सुरळीत होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लासलगाव हे मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील महत्त्वाचे गाव आहे. त्यांच्याकडे खाद्य संरक्षण खात्याची जबाबदारी असताना, याच ठिकाणी ग्राहकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे मंत्री महोदयांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून ग्राहकांना दिलासा द्यावा.
प्रकाश पाटील, पं. स. माजी सदस्य, लासलगाव
एक महिन्यापूर्वी गॅस सिलिंडरची नोंदणी केली आहे. ऑनलाइन पेमेंट करूनही अद्याप सिलिंडर मिळालेले नाही. एजन्सीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे ग्राहकांनी नेमकी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विकास खंडीझोड, ग्राहक लासलगाव