

येवला (नाशिक) : लाडक्या बहिणींचा सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडला हे खरे असून, यात लपविण्यासारखे काही नाही. एखाद्या मोठ्या घरात खर्च वाढतो, त्यावेळी नेहमीचे खर्च मागेपुढे करावे लागतात तसेच परिस्थिती बदलली की, सगळ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळतील असे सांगत सरकार आर्थिक अडचणीत असल्याची कबुलीच सार्वजनिक अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मंत्री भुजबळ हे सोमवारी (दि. 14) येवला दौऱ्यावर असतानान त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
मंत्री भुजबळ म्हणाले की, लाडक्या बहिणाबाईंना पैसे मिळत आहेत तसे लाडक्या भावांचेही अनुदानाचे पैसे मिळतील. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या घरात खर्च वाढली की, नेहमीचे खर्च मागे-पुढे करावे लागतात तसेच सध्या सरकारला करावे लागत आहे. मात्र, सगळ्यांना पैसे मिळतील असा दावा त्यांनी केला. ॲड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर झालेल्या नियुक्तीबाबत बोलताना ते म्हणाले की, ॲड. निकम यांना खासदारकी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. आपले सर्व कौशल्य पणाला लावून कसाब सारख्या मोठ्या केसचा निकाल त्यांनी लावला.
जनसामान्यांचा विश्वास त्यांनी मिळविलेला आहे. अनेक लोक खासदार होतात मात्र, त्यांचे व्यवसाय चालूच असतात. अनेक कलाकार खासदार झाल्यानंतरही आपले सिनेमातील काम सुरूच ठेवतात. तसा खासदारकीचा निकम यांच्या वकिलीवर फारक पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उत्पन्नवाढीसाठी काही निर्णय सरकारला घ्यावे लागतात. वाइन परवान्याचा निर्णय त्याच पैकी आहे. शासनाचा खर्च वाढत आहे. शेतकऱ्यांचे पैसे अद्याप द्यायचे आहेत. शासन हा पैसा टॅक्समधूनच गोळा करत आहे. कुठून तरी पैसे आले तरच लाडक्या बहिणी, शेतकरी, विद्यार्थी यांना मदत करता येईल अशी पुष्टी यावेळी मंत्री भुजबळ यांनी यावेळी जोडली.
ठाकरे बंधूंचा मेळावा आणि शिंदेंची चलबिचल यावर बोलताना कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला, याचे पॅरामीटर म्हणजे निवडणूक असून, निवडणुकीतच कोण पुढे जाते आणि कोण मागे राहते हे कळेल असे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत काय? या प्रश्नावर बोलताना भाजपासारख्या पक्षातही दोन वर्षांनंतर अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया होत असते, तसे प्रत्येक पक्षात आहे. वेगवेगळ्या लोकांना संधी दिली जाते. पाटील यांनी स्वतःच इतरांनाही संधी द्यावी, असे म्हटले हाेते, म्हणून ती जागा खाली केली असेल. राज्यसभा खासदारकीच्या मुद्यांवर येवलेकरांची इच्छा असेल तर त्यांना विचारून पाहतो पण 'शिळ्या कढीला ऊत नको' अशी मिश्किल टप्पणीही त्यांनी यावेळी केली.