

कोल्हापूर : जिल्ह्यात डाक विभागात सध्या 5 लाख 32 हजार 675 नागरिकांनी खाती सुरू केली आहेत. महिलांसह ज्येष्ठ नागरिक, मुली आणि बचतीसाठी इच्छुक नागरिकांनी या योजनांसाठी डाक विभागाला पसंती दिली आहे. जिल्ह्यात लाडक्या बहिणींची 2 लाखांवर खाती उघडली गेल्याने डाक कर्मचार्यांवर ताण वाढला आहे.
एरवी मोकळा असणारा डाक विभाग पुन्हा गजबजला. खासगी किंवा सरकारी बँकेत खाते उघडण्यासाठी विविध कागदपत्रांचा तगादा लागल्यामुळे डाक विभागात केवळ आधार कार्ड दाखवून महिलांना खाते उघडता आले. परिणामी पोस्टात महिला खातेदारांची संख्या वाढली. डाक विभागाने एप्रिल 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये कोल्हापूर विभागाने एका वर्षात एकट्या लाडकी बहीण योजनेंतर्गत 2,43,358 महिलांची खाती उघडली आहेत. गेल्या 8 वर्षांत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी 2,66,95,357 खाती महिलांनी उघडली आहेत. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत विभागाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांची डाक विभागावरील विश्वासार्हता अधोरेखित होते.
लाडकी बहीण : 2, 43, 358
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना : 2,66,95,357
मनरेगा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : 5,366
नमो शेतकरी : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : 65,664
पीएम किसान : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 81,197
एलपीजी : 40,719