

नाशिक : निखिल रोकडे
स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात मुलांचे व तरुणांचे मानसिक आरोग्य हा सध्या अत्यंत गंभीर विषय झालेला आहे. अल्पवयीन मुले, किशोरवयीन विद्यार्थी आणि तरुणांमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. एक काळी आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक संकटे ही प्रमुख कारणे मानली जात होती.
मात्र, आज कौटुंबिक संवादाचा अभाव, शैक्षणिक स्पर्धा, अभ्यासाचा ताण, सोशल मीडियाचा अतिरेक, डिजिटल व्यसन, भावनिक एकटेपणा, अपयशाची भीती, कौटुंबिक संवादाचा अभाव आणि मानसिक नैराश्य यासारखी कारणे अधिक ठळकपणे समोर येत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता, मोबाईल, ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडियामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढत असून, मैदानी खेळ, वाचन, कुटुंबांशी संवाद आणि सामाजिक सहभाग कमी होत आहे. सतत इतरांशी तुलना, लाईक्स-फॉलोअर्सची मानसिकता, सायबर बुलिंग आणि आभासी जगतात रमण्याची प्रवृत्ती यामुळे मुलांचे भावनिक संतुलन बिघडत आहे. त्याचबरोबर चुकीची संगत, कौटुंबिक तणाव आणि मूल्यशिक्षणाचा अभाव यामुळे काही मुले-मुली गैरप्रकारचे निर्णय घेताना दिसून येत आहे.
आठवी ते दहावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा मानला जातो. याच काळात शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल वेगाने घडत असतात. त्यामुळे केवळ अभ्यासावर भर न देता, मानसिक, शैक्षणिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचा समतोल राखणे आवश्यक आहे. या तीन घटकांचा समतोल साधल्यास मुलांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मकता आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण अधिक सक्षम होतो.
"अल्पवयीनांच्या आत्महत्या ही केवळ कायद्याची नव्हे, तर सामाजिक आणि कौटुंबिक चिंतेची बाब आहे. मुलांना दोष देण्याऐवजी त्यांची मानसिक स्थिती, कौटुंबिक वातावरण आणि सामाजिक प्रभाव समजून घेणे आवश्यक आहे. पालकांचा संवाद, मूल्याधिष्ठित शिक्षण, समुपदेशन, खेळ आणि वाचनसंस्कृती यांवर भर दिल्यास मुलांचा सर्वांगीण विकास होईल. शासन, शाळा आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून बालगुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल."
- डॉ. पी. व्ही. रसाळ, प्राचार्य, वरिष्ठ महाविद्यालय के. के. वाघ
"आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना केवळ गुणांसाठी नव्हे, तर संतुलित जीवनासाठी घडवणे अधिक महत्त्वाचे आहे. मानसिक, शैक्षणिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचा समतोल राखल्यास मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. मुलांवरील अनावश्यक दडपण कमी करून त्यांना सकारात्मक दिशा दिल्यास, ते आत्मविश्वासपूर्ण, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक म्हणून घडतील."
- डॉ. प्रतिभा चांदक, समुपदेशक
शैक्षणिक स्पर्धा व परीक्षेचा ताण
अपयशाची भीती, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव
सोशल मीडिया, मोबाईल व ऑनलाइन गेमिंगचे व्यसन
सायबर बुलिंग व आभासी जगाशी तुलना
पालक-मुलांमधील संवादाचा अभाव
कौटुंबिक तणाव, विभक्त कुटुंब, भावनिक असुरक्षितता
चुकीची संगत, हिंसक प्रवृत्ती व मूल्यशिक्षणाचा अभाव
खेळ, छंद आणि वाचनसंस्कृतीपासून दुरावा
मानसिक आरोग्याबाबत जागरूकतेचा अभाव
पालकांनी मुलांशी दररोज मोकळा संवाद साधणे
शाळा-महाविद्यालयांनी समुपदेशकाद्वारे मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे
मोबाईल व सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवून खेळ, व्यायाम, वाचनाला प्रोत्साहन देणे
मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे न टाकता, अपयश स्वीकारण्याची मानसिक तयारी करून घेणे
वर्तनात अचानक बदल, नैराश्य किंवा एकटेपणा दिसल्यास तातडीने मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकांचा सल्ला घेणे