

स्नानासाठी अलॉट गर्दी, मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला
नव्या घाटांवर भाविकांची मांदियाळी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याचा ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर, रविवारी त्र्यंबकेश्वरी भाविकांचा महापूर लोटला. व्हीआयपी बंदोबस्तामुळे गेल्या दोन दिवसांपासून लागू असलेले कडक निबंध शिथिल होताच, सुमारे १० हजारांहून अधिक भाविकांनी कुशावर्त तीर्थावर पवित्र स्नानासाठी आणि त्र्यंबकराज्याच्या दर्शनासाठी गर्दी केली.
राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अर्धा डझन मंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी पार पडला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणास्तव मुख्य मार्गावर दोन्ही बाजूंनी पांढरे पडदे लावून अर्धवट राहिलेली विकासकामे झाकण्यात आली होती. स्थानीय नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आल्याने कुशावर्तावरील स्नान आणि मंदिरिातील दर्शन सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.
रविवारी हा सोहळा निर्विघ्न पार पडताच त्र्यंबककरांसह दूरवरून आलेल्या भाविकांनी थेट कुशावर्त तीर्थ व मंदिराकडे धाव घेतली. पवित्र कुशावर्तात डुबकी मारून भाविकांनी पुण्य पदरी पाडून घेतले.
भाविकांच्या या ओघांमुळे गेल्या दोन् दिवसांपासून बंद असलेले बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत झाले. फूलविक्रेते, हॉटेलस आणि विविध व्यावसायिकांनी दुकाने उघडल्याने मंदिर परिसर पुन्हा गजबजला. त्यातच दिवाळीचा माहोल असल्याने खरेदीसाठीही नागरिकांची मोठी लगबग दिसून आली.
ऐतिहासिक कुशावर्त तीर्थावर मर्यादित जागा असल्याने प्रशासनाने पेगलवाडी येथील प्रयागराज तीर्थानजीक गोदावरी पात्रात नवीन घाटांची निर्मिती केली आहे. या नवीन घाटांवरही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडल्याने या जागेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अद्याप येथील विकासकामे प्रगतिपथावर असली, तरी भाविकांनी या नव्या घाटांवर (नवीन कुशावर्त) स्नानासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली.