Kunbi certificate : नाशिक जिल्ह्यातील दोन लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार

File Photo
File Photo

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात कुणबी, कुणबी-मराठा तसेच मराठा-कुणबीची नोंदी आढळलेल्या दाेन लाख आठ हजार ४० बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. तालुकानिहाय शिबिरांच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहेत.

राज्यातील मराठा बांधवांना कुणबी, कुणबी-मराठा व मराठा कुणबीच्या ५४ लाख नोंदी आढळून आल्या आहेत. सदरच्या नोंदी शोधण्यासाठी महसूल विभागाकडील जुने रेकॉर्ड, सातबारा नोंदी, नुमना ८ अ, शाळेच्या दाखल्यावरील नोंदी, भुमी-अभिलेख विभागाकडील नोंदवहीतील रेकॉर्ड, शासनाने निर्गमित केलेले दाखले यासह विविध रेकाॅर्डची तपासणी झाली होती. याशिवाय मराठा बांधवांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदीसंदर्भातील निजामकालीन पुरावे, वंशावळी, निजाम काळातील करार व निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज पुरावेदेखील तपासण्यात आले.

राज्यभरात आढळलेल्या कुणबी नोंदीनुसार पात्र मराठा समाजबांधवांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र वितरण करावे, असे आदेश महसूल विभागाचे अपर सचिव राजगोपाल देवरा यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील दोन लाख आठ हजार ४० पात्र मराठा बांधवांना प्रमाणपत्र वितरण केले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून शिबिरांचे नियोजन आहे. त्यामुळे लवकरच पात्र मराठा समाजबांधवांच्या हाती कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे.

गावस्तरावर मोहीम

शासन आदेशानुसार ज्यांच्या कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आल्या आहेत, अशा सर्व पात्र मराठा बांधवांना प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे. संबंधितांना त्यांचे नावे पाहण्यासाठी सर्व तलाठ्यांमार्फत गावनिहाय याद्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना शासनाने केल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news