

नाशिक : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरण स्थापन करण्याचा आराखडा प्रशासनातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला.
सिंहस्थ प्राधिकरण स्थापन करण्याचा आराखडा प्रयागराजच्या धर्तीवर तयार करण्यात आला असून, नगरविकास विभागाकडून हा आराखडा मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. सिंहस्थाशी संबंधित प्रत्येक विभागाचा अधिकारी या प्राधिकरणात असणार आहे. त्याचप्रमाणे सिंहस्थाशी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार प्राधिकरणातील उच्चस्तरीय समितीकडे असणार आहेत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. सिंहस्थासाठी नाशिक महापालिकेचा १५ हजार कोटींचा, तर अन्य शासकीय विभागांकडून नऊ हजार कोटी असा एकूण २४ हजार कोटींचा आराखडा शासनाला मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मात्र अद्याप या आराखड्याला मंजुरी मिळालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग वगळता अन्य विभागांच्या कामांना अद्याप निधी मिळालेला नाही. आता सिंहस्थाला जेमतेम दोन वर्षांचा कालावधी असताना सिंहस्थकामांना सुरुवात होऊ न शकल्याने साधू-महंतांमध्ये शासनाविषयी नाराजी वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता सिंहस्थ नियोजनाला गती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील अधिकाऱ्यांचे पथक प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याच्या दौऱ्यावर जाऊन आले. सिंहस्थ कुंभमेळ्यात करावयाच्या सोयीसुविधांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापनेची शिफारस या पथकाने केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली होती. शुक्रवारी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत प्राधिकरणाचा आराखडा सादर करण्यात आला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी प्राधिकरणात महसूल, महापालिका, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पोलिस, महावितरण, स्मार्ट सिटी, राज्य परिवहन महामंडळ, न्हाई अशा विविध विभागांचे अधिकारी सदस्य असणार आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी या प्राधिकरणाचा प्रमुख असणार असून, त्याच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटी अर्थात उच्चस्तरीय समिती असणार आहे. सिंहस्थाशी संबंधित संपूर्ण कामांचे नियंत्रण समितीकडे असणार आहे.