

नाशिक : येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात जगभरातून येणाऱ्या उद्योजक, साहित्यिक व कलावंतांच्या निवास व्यवस्थेसाठी उद्योग व मराठी भाषा विभागाच्या वतीने दोन वेगवेगळ्या 'टेंट सिटी' उभारल्या जाणार आहेत. या माध्यमातून नाशिकमध्ये किमान 10 मोठे उद्योग आणण्याचा उद्देश असल्याचे, उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि. ११) सांगितले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने त्र्यंबक रोड येथे उभारलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या मुख्य इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सीमा हिरे, सरोज आहिरे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, एमआयडीसी छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता बाळासाहेब झंजे, उपकार्यकारी अधिकारी संतोष भिसे, प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, अधीक्षक अभियंता सचिन राक्षे, कार्यकारी अभियंता जयवंत पवार, इड्यूस पार्कचे प्रमुख कमलजितसिंग गुप्ता, संचालक डॉ. मुकुंद शिंदे, उद्योग सहसंचालिका वृषाली सोने, 'निमा'चे अध्यक्ष आशिष नहार, 'आयमा'चे अध्यक्ष ललित बुब उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले की, कुंभमेळा व उद्योग विभागाचा काही संबंध नसतो. मात्र, इतिहासात प्रथमच उद्योग विभाग व मराठी भाषा विभागाकडून कुंभमेळ्यात नाशिकमध्ये दोन टेंट सिटी उभारल्या जाणार आहेत. उद्योग विभागाच्या टेंट सिटीद्वारे जगभरातून येणाऱ्या उद्योजकांच्या निवासाची सोय केली जाणार असून, त्यांना सुलभरीत्या दर्शन घडवणे, उद्योगांसाठी जागा दाखवणे आदी कामे केली जाणार आहेत. त्याची नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली आहे.
मराठी भाषा विभागाच्या वतीनेही 'तंबू निवास' उभारले जाणार असून, जगभरातील साहित्यिक, कलावंतांना कुंभमेळ्याचा अनुभव घेता यावा, यासाठी विशेष यंत्रणा तयार केली जाणार आहे. याशिवाय देशातील पहिले आदिवासी क्लस्टर जांबुटके येथे साकारत असून, त्यात आदिवासींना उद्योग उभारणीसाठी अनुदान दिले जाणार आहे. मालेगाव येथे प्लास्टिक क्लस्टरसाठी भूसंपादन केले जात आहे. औद्योगिक क्षेत्रात आवश्यक तेथे रस्ता कामांना मंजुरी दिली जाईल, असेही सामंत म्हणाले. कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. मुकुंद शिंदे यांनी प्रास्ताविक, तर शलाका भेंडे यांनी सूत्रसंचालन केले.
उद्योग विभागाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत उद्योग क्रांती झाली असून, नवीन उद्योग निर्मितीत राज्य अग्रेसर राहिले आहे. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व सुविधांसह उत्तम प्रशिक्षण मिळणार असून, कुशल कामगार तयार होणार आहेत. उद्योग क्षेत्राबरोबरच शेती क्षेत्राशी संबंधित उद्योगांनाही उभारी देण्यास उद्योग विभागाने चालना द्यावी, अशी भावना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.
स्पर्धेत टिकायचे असेल, तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून आवश्यक कौशल्ये विद्यार्थांनी आत्मसात केली पाहिजेत. यात महिला उद्योजकांनी सहभागी होऊन पुढे येणे गरजेचे आहे. नाशिकला औद्योगिक विकासाच्या दृष्टीने वातावरण पोषक आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातही उद्योग उभारणीसाठी चालना द्यावी, अशी अपेक्षा अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय्यमंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली.
'एमआयडीसी'च्या वतीने राज्यात प्रायोगिक तत्त्वावर पाच ठिकाणी व नंतर प्रत्येक विभागातील पाच शहरांत कौशल्य विकास केंद्रे उभारली जाणार असून, असे राज्यातील पहिले केंद्र नाशिकमध्ये आज सुरू झाल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. या केंद्रातून मार्च २०२८ पर्यंत आठ हजार विद्यार्थी प्रशिक्षित करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असे संचालक डॉ. मुकुंद शिंदे यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी कंपनीतर्फे प्रकल्प
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात साधु-महंत व भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत. नाशिक, त्र्यंबकेश्वर शहरात येणाऱ्या वाहनांवर ५३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून 'वॉच' ठेवला जाणार आहे. सिंहस्थात येणाऱ्या वाहनांची माहिती या माध्यमातून घेतली जाणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या २०२६-२७ सिंहस्थ तयारीला वेग आला आहे. सिंहस्थासाठी महापालिकेने १५ हजार कोटींचा तर महापालिकेसह अन्य विभागांचा एकत्रितरित्या २४ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा सादर केला होता. त्यापैकी १००४ कोटी रुपयांची तरतूद विधीमंडळ अधिवेशनात पुरवण्या मागण्यांच्या मंजुरीदरम्यान करण्यात आली. त्याआधारे कुंभमेळा प्राधिकरणाने सिंहस्थ कामांचा प्राधान्यक्रम ठरवत ३०६८ कोटी रुपयांची कामे हाती घेण्याचे निश्चित केले. आगामी सिंहस्थात पाच कोटी भाविक तसेच जवळपास दहा लाख साधु-महंत पर्वणीच्या दिवशी उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
सिंहस्थात नाशिकरोड व्यतिरिक्त ओढा, देवळाली कॅम्प, कसबे-सुकेणे येथे रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्वणीच्या दिवशी वाहनतळे विकसित केले जाणार आहे. सोळा ठिकाणी वाहनतळांचे नियोजन आहे. पर्वणी तारखांसह वर्षभर येणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून ५३०० सीसीटीव्ही कॅमेरे उभारले जाणार आहेत. कंपनीच्या वतीने शहरात १३०० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नाशिकसह त्र्यंबकेश्वर शहरात चार हजार कायमस्वरुपी सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
सिंहस्थात वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहनांची संख्या मोजण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून ५३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. .
सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी.
नाशिक, त्र्यंबकेश्वर शहरात सर्व मार्गांनी येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची संख्या मोजण्यासाठी ज्या रस्त्यांवर टोल नाके आहेत. अशा सर्व रस्त्यांवर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गाड्यांची संख्या नियंत्रण कक्षाला कळविली जाणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण स्मार्ट सिटी कंपनी मुख्यालयातील कमांड कंट्रोल सेंटर तसेच पोलिस आयुक्तालयातील कमांड कंट्रोल सेंटरमधून होईल.