

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दोन वर्षांवर आला असताना शासनाकडून अद्याप सिंहस्थ निधीची घोषणा न झाल्याने महापालिका प्रशासनाची पुरती कोंडी झाली आहे. सिंहस्थ कामे वेळेत पुर्ण होण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर हरीत कर्जरोखे अर्थात ग्रीन बॉण्ड उभारण्याची तयारी नाशिक महापालिकेने सुरू केली आहे.
शासनाकडून देखील हरित कर्ज रोखे उभारण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याने कर्जरोख्यांच्या माध्यमातून शहरात पर्यावरणपूरक हरित सुविधा उभारण्याचे महापालिकेचे प्रयत्न राहणार आहेत.
येत्या २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थाची जोरदार प्रशासकीय तयारी सुरू आहे. सिंहस्थ कामांसाठी महापालिकेने सुमारे १५ हजार कोटींचा आराखडा शासनाला सादर केला. मात्र त्यास अद्यापही मंजुरी मिळू शकलेली नाही. शासन पातळीवर केवळ बैठकांचे सत्र सुरू आहे. शासनाच्या निर्देशांनुसार चार हजार कोटींच्या प्राधान्याने हाती घ्यावयाच्या कामांची यादी देखील महापालिकेने सादर केली; परंतू त्या यादीतील कामांना देखील अद्याप अर्थखात्याकडून ग्रीन सिग्नल मिळू शकलेला नाही. त्यामुळे महापालिकेने पहिल्या टप्प्यात स्वनिधीतून कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून पाच ठिकाणी पूल उभारण्याची निविदाप्रक्रिया पार पडली असून त्यापैकी लक्ष्मीनारायण व रामवाडी पुलाला समांतर पुलाच्या उभारणीचे काम केले जाणार आहे. उर्वरित कामांसाठी शासन निधीची वाट पाहावी लागणार आहे. निधीची जुळवाजुळव करण्याचा भाग म्हणून आता हरित कर्जरोखे काढण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. भांडवली बाजार तसेच रोखे बाजारातून महापालिकांनी निधी उभारावा, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकतेच दोनशे कोटी रुपयांचे हरित कर्जरोखे शेअर बाजारात लिस्टींग केले. त्याधर्तीवर नाशिक महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उभारण्याकरीता प्रयत्न सुरू केले आहेत.
हरित कर्जरोख्यांसाठी केंद्र सरकारकडून १३ टक्के प्रोत्साहन निधी दिली जाणार आहे. त्यामुळे १०० कोटींचे कर्जरोखे उभारल्यास १३ कोटी शासनाकडून प्राप्त होतील. त्याशिवाय शंभर कोटींवर साधारण चार ते पाच टक्के व्याज मिळेल, असे जवळपास वार्षिक पाच कोटी रुपये प्राप्त होतील. शेअरधारकांना देखील कायमस्वरुपी ठरवून दिलेले व्याज मिळेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
पिंपरी - चिंचवड महापालिकेने हरित रोखे जारी केले आहे. हरितरोखे काढणारी देशात पहिली महापालिका ठरली आहे. त्याधर्तीवर नाशिक महापालिकेचे प्रयत्न आहे. अद्याप निर्णय झालेला नाही. प्राथमिक स्तरावर प्रक्रिया आहे.
दत्तात्रय पाथरुट, मुख्य लेखाधिकारी, नाशिक महानगरपालिका.