

नाशिक : निधी नसल्याचे कारण देत सिंहस्थ कामांना हात न लावणाऱ्या महापालिकेने कुणाचीही मागणी नसताना विश्रामगृह उभारणीसाठी तब्बल आठ कोटींचा खर्च करण्याची तयारी केली आहे. इतकेच नव्हे तर, प्रशासकीय राजवट सुरू असताना महापौर, उपमहापौरांची दालने तसेच जिल्हाधिकाऱ्याचे निवासस्थान दुरूस्तीसाठी आणि नव्याने रूजू झालेल्या अतिरीक्त आयुक्तांच्या दालनासाठी १५ कोटींच्या खर्चाचा बार उडविला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे बळ यासाठी लाभणार आहे. विशेष म्हणजे, महासभेत जादा विषयात यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
प्रशासकीय राजवटीत महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. करसवलत देऊनही करदाते पाठ फिरवत असल्याने करवसुली मंदावली आहे. लोकप्रतिनिधींची राजवट नसल्याने शासनाने देखील एन-कॅपचा कोट्यवधींचा निधी महापालिकेस देण्यात नकार दिला आहे. त्यातच सिंहस्थ कुंभमेळा दोन वर्षांवर येऊन ठेपला असताना सिंहस्थ आराखड्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने सिंहस्थ कामे खोळंबली आहे. अशा आर्थिक कोंडीतून मार्गक्रमण करणाऱ्या महापालिकेला अवाजवी खर्चावर नियंत्रण आणणे गरजेचे असताना गरज नसलेल्या कामांवर कोट्यवधींची उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे. जानेवारीत होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर, उपमहापौर, गटनेते, तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची दालने चकाचक करण्यासाठी कोट्ट्यावधी रुपयांचा खर्च करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. निधी नाही म्हणून रडगाणे करणाऱ्या महापालिकेला चक्क स्वतःच्या मालकीचे विश्रामगृह बांधायचे असून त्यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यांमधून आठ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता घेण्यात आली आहे. पहिला टप्प्यात चार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
त्र्यंबकरोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावालगत जिल्हाधिकाऱ्यांचे ब्रिटिशकालीन निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या दुरूस्तीची कामे करण्यात आली असून त्यासंदर्भातील कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
महापालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता आहे. नव्याने निवडून येणाऱ्या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती दालन, महापौर बंगला, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, गटनेत्यांची दालने दुरुस्त करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. व्हीआयपी, खुर्ची, टेबल, विजिटर चेअर सोफा, टि पॉय, कार्पेट, पडदे, पार्टिशन, रंगरंगोटीचा यात समावेश आहे.