

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ पर्व काळात कुशावर्तावर आखाड्याच्या देवता स्नान करतील तर साधू आणि भक्त शहराच्या बाहेर गोदावरी तीरावर ५ किलोमीटर लांबीचे घाट बांधून तेथे स्नान करतील, असा महत्त्वपूर्ण बदल यावेळी करण्यात येणार आहे. याबाबत आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी महाराज यांनी अधिकृत घोषणा केली. त्यास महामंत्री महंत हरिगिरी महाराज यांनी सर्व साधू- महंतांची संमती असल्याचे जाहीर केले.
शहराच्या बाहेर पाच किमी अंतर गोदावरी पात्राला दोन्ही बाजूने घाट बांधण्यात येतील.
स्नानासाठी कुशावर्ताच्या व्यतिरिक्त परिसरात ५०० कुंड आहेत त्यांचे पुनर्जीवन करणार.
मेनरोड गंगास्लॅब काढण्याचे काम सुरू करणार.
गोदावरी बारमाही प्रवाही राहण्यासाठी तजवीज व गरज पडल्यास नव्याने धरण बांधणार.
मेनरोडवर असलेला भाजीबाजार व इतर व्यावसायिकांना इतरत्र
त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाबाबत शुकवारी (दि. २८) नगर परिषद सभागृहात आखाडा परिषद आणि जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यात या निर्णयाची घोषणा करण्यात आली. बैठकीसाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक आदित्य मिरवेलकर, उपविभागीय अधिकारी ओमकार पवार, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, तहसीलदार श्वेता संचेती, नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके उपस्थित होते.
बैठकीपूर्वी आखाडा परिषद अध्यक्ष महंत रवींद्र पुरी महाराज, महामंत्री महंत हरिगिरी महाराज, कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा अभिषेक केला. यावेळी मंत्री महाजन यांनीही मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी शहर परिसराची पाहणी केली. यामध्ये अहिल्या धरण, बिल्वतीर्थ, गोदावरी नदी आणि परशुराम घाट, श्रीचंद्र घाट, अहिल्या गोदावरी संगम घाट, गंगासागर तलाव, प्रयाग तलावासह शहरापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत गोदावरी नदीपात्राची पाहणी केली. यावेळी बैठकीसाठी महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, महंत गणेशानंद सरस्वती यांसह विविध आखाड्यांचे साधू-महंत तसेच पुरोहित संघ अध्यक्ष मनोज थेटे, सिंहस्थ नागरी समिती अध्यक्ष सुरेश गंगापुत्र आदी उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान गोदावरी पात्र अत्यंत अस्वच्छ असल्याचे दिसून आले. त्यामुळे साधू-महंतांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचसोबत काही ठिकाणी नदीपात्रात मलमूत्र सोडले जात असल्याचे तसेच काही ठिकाणी नदीपात्रात बांधकाम झालेले असल्याचे पाहून खेद व्यक्त केला. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी केली.
महंत हरिगिरी महाराज यांनी गोदावरीच्या दोन्ही काठाने ६० किलोमीटर अंतर घाट बांधावे व जागोजागी सुविधा निर्माण करव्यात. सिंहस्थ पर्वकाळात भाविकांनी या घाटावर स्नान करावे व पुण्य प्राप्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. गोदावरी नदीपात्राची स्वच्छता करावी, बारा महिने नदीत पाणी वाहते ठेवावे आणि मेनरोड परिसरातील नदीपात्रावर असलेला स्लॅब काढून टाकावा नदीचे आणि कृशावर्तासह सर्व तलावांचे पाणी आचमन करता येईल असे शुद्ध ठेवावे, अशी मागणी केली.
महंत रवींद्र पुरी महाराज यांनी कुशावर्ताला पर्यायी घाटांवर स्नान करण्याची आखाड्यांची तयारी असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता पुढील कालावधीत कुशावर्तावर स्नान करणे, मिरवणुका घेऊन जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल तसेच नाहक जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी साधू आखाड्यांनी बदलाची तयारी दर्शविली आहे.