Minister Girish Mahajan | त्र्यंबक साधुग्रामची जागा बदलणार

Minister Girish Mahajan | कुंभमेळामंत्री महाजनः व्हीआयपींसाठी स्वतंत्र अमृतस्नान मार्गाचाही प्रस्ताव
Girish Mahajan
Girish MahajanPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित साधुग्रामच्या जागेवर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने त्या जागेचा फेरविचार सुरू झाला आहे. तसेच नाशिकमध्येही अमृत स्नानाच्या दिवशी व्हीआयपर्णीसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याबाबतही राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

Girish Mahajan
Nashik Slow Simhastha Works | सिंहस्थ कामे कासवगतीने; भाविकांसाठी अडथळ्यांची शर्यत

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कुंभमेळा तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी दिली. मंत्री महाजन यांनी दुपारी रामतीर्थ परिसराची पाहणी करून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामांचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य केले.

महाजन म्हणाले की, मंगळवारी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली असता सिंहस्थासाठी आरक्षित केलेल्या साधुग्रामच्या प्रस्तावित जागेवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले दिसून आले. या पार्श्वभूमीवर साधुग्रामची जागा बदलण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन असून, संबंधित यंत्रणांकडून त्याचा अभ्यास सुरू आहे. याशिवाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या पावसाची तीव्रता लक्षात घेता सिंहस्थातील अमृतस्नानाच्या वेळी गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी व्हीआयपींसाठी स्वतंत्र मार्गाची आवश्यकता आहे का, याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Girish Mahajan
Nashik Trimbakeshwar Kumbh Mela | साधुग्रामचे काम आतापासूनच सुनियोजित करावे : महाजन

मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीसह अनेक नद्या, नाले दुथडी वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन महाजन यांनी केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची कबुली देताना महाजन म्हणाले, या गैरसोयीबद्दल मी अनेक वेळा नागरिकांची माफी मागितली आहे. मात्र, नाशिककरांनी आणखी काही दिवस सहकार्य करावे. सिंहस्थाची सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

सिंहस्थ कामांमध्ये तडजोड नाही

मुसळधार पावसामुळे सुरू असलेल्या अनेक विकासकामांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी संबंधित ठेकेदारांकडून आवश्यक ती दुरुस्ती करून दर्जेदार काम करून घेतले जाईल. कोणत्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या कामांमध्ये तडजोड केली जाणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. विक्रमी पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचणे आणि अडचणी निर्माण होणे अपरिहार्य असल्याचे सांगताना महाजन म्हणाले की, कितीही मोठा पाऊस झाला तरी कुठेही पाणी साचणार नाही, अशी यंत्रणा जगात कुठेही उपलब्ध नाही. मात्र, पावसामुळे होणारा त्रास कमीत कमी राहावा यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news