

शेतीतील वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता, पाणी व्यवस्थापन आणि बदलत्या हवामानाची आव्हाने लक्षात घेता कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत शेतीची कामे अधिक अचूक, कमी खर्चात आणि कमी वेळेत करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध उपकरणांचे दर्शन कृषिथॉन २०२६ मध्ये घडत आहे.
चालकाविना चालणारे स्वयंचलित ट्रॅक्टर, विजेवर चालणारी यंत्रे, उपग्रहाच्या मदतीने अचूक पेरणी, मोबाइलद्वारे सिंचन नियंत्रण अशा नावीन्यपूर्ण प्रयोगांनी प्रदर्शनात शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
या प्रदर्शनात ४५ आणि ५५ एचपी क्षमतेचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मांडण्यात आले आहेत. डिझेलऐवजी विजेवर चालणाऱ्या या ट्रॅक्टरमुळे इंधन खर्चात बचत होण्याबरोबरच धूर आणि आवाजाचे प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर चालकाविना शेतातील निश्चित क्षेत्रात नांगरणी, रोटाव्हेटर आणि कल्टिव्हेटरची कामे करणारे स्वयंचलित ट्रॅक्टरही आकर्षण ठरत आहेत.
मोबाइलवरून सूचना देत या यंत्रांचे नियंत्रण करता येते. पेरणीतील अचूकतेसाठी उपग्रहाधारित ऑटो स्टिअरिंग प्रणाली विशेष लक्षवेधी आहे. ट्रॅक्टरला जोडलेल्या या यंत्रणेमुळे शेतातील निश्चित मार्गावर ट्रॅक्टर आपोआप चालतो. दोन सेंटीमीटरपर्यंत अचूकता मिळत असल्याचा उत्पादकांचा दावा आहे. परिणामी, पेरणीतील ओळींचे अंतर समान राखणे, बियाणे व खतांचा अपव्यय टाळणे शक्य होणार आहे.
पाणी व्यवस्थापनासाठी मोबाइलवरून मोटार आणि व्हॉल्व्ह सुरू-बंद करण्याची सुविधा देणाऱ्या स्वयंचलित सिंचन प्रणालीही उपलब्ध आहेत. सौरऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रणांमुळे वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करण्याचा पर्यायही शेतकऱ्यांसमोर आहे. यंत्रसामग्रीबरोबरच सुधारित संकरित बियाण्यांचे विविध वाणही प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.
दोन फुटांपेक्षा अधिक लांबी वाढणारा दुधी भोपळा, अधिक तोडणी देणारी भेंडी, आकर्षक रंगाची वांगी आणि रोगप्रतिकारक कारले यांसारख्या वाणांची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना पाहता येत आहेत. माती-पाणी परीक्षण, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, मल्चिंग पेपर, जैविक खते तसेच फळे-भाजीपाला स्वच्छता, प्रक्रिया आणि प्रतवारी करणाऱ्या यंत्रांचे पर्यायही उपलब्ध आहेत.
एकूणच, पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे आणि शेती अधिक फायदेशीर करण्याच्या दृष्टीने कृषिथॉनमधील प्रयोग शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत.