

बोरगाव : पुढारी वृत्तसेवा
शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे शनिवारपासून (दि. १७) सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू आहे.
पाच दिवसांनंतरही शासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलकांनी बुधवारी दुपारी ३ वाजता नाशिकच्या दिशेने पायी कूच केली. या आंदोलनात पाच ते सहा हजार आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांतील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार जे. पी. गावित करत आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
आंदोलनात जनार्दन भोये, सावळीराम पवार, वसंत बागूल, पुंडलिक भोये, संदीप भोये, अशोक भोये, भगवान गांगुर्डे, भास्कर जाधव, अशोक धूम, नितीन गावित कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांचा पहिला मुक्काम पांडाणे येथे होणार आहे. शक्यतो शुक्रवारी नाशिकमध्ये आंदोलक पोहोचतील. सुरगाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कुंवर, उपनिरीक्षक खाडे व अन्य कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
निफाडला थंडीतही रात्रभर ठिय्या निफाड : वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अखिल भारतीय किसान सभेचे निफाड तहसील प्रवेशद्वारावर सलग तिसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन सुरूच आहे. दोन दिवस कडाक्याच्या थंडीतही तहसीलच्या गेटवरच मुक्कामी आहेत.
जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. आंदोलकांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिलेल्या निवेदनात प्रलंबित प्रश्नांचा पाढा वाचला. आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष वाळूबा ससाणे, सचिव डॉ. पारधे, उपाध्यक्ष भाऊसाहेब सूर्यवंशी, म्हसू गुंजाळ, सहसचिव डावल मोरे, ताई वाघ, वैशाली सूर्यवंशी यांनी केले.
महामार्गावर वाहतूक कोंडी चांदवड :
आंदोलक नाशिककडे निघाल्याने चांदवडकडून नाशिककडे जाणारी वाहतूक एकेरी वळवण्यात आल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे हाल झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक कैलास वाघ, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलवण्यात आली होती. या पायी मोर्चामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक एकेरी वळवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.
आंदोलन तीव्र करणार
गेल्या पाच दिवसांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने, तालुका प्रशासन बिनधास्त राहिल्याने आणि जिल्हा प्रशासनाने शिष्टमंडळाला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने हे आंदोलन अधिक तीव्र आणि आक्रमक होणार असल्याचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी सांगितले.