

मालेगाव : मालेगाव येथे बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात अर्जदारांनी खोटी माहिती पुरवत सरकारी यंत्रणा व न्यायालयाची फसवणूक केल्याचे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यांनी या संदर्भात १०० जणांची नावे आणि पुरावे छावणी पोलिसांना सादर केले असून तशी तक्रार दाखल केली आहे.
मालेगाव रोहिंग्यांसाठी आश्रयस्थान बनले आहे, यासंदर्भात भक्कम पुरावे असल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः मालेगाव महापालिका आणि तहसील कार्यालयाने चार हजार पेक्षा अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मदाखले दिले असून हा व्होट जिहादचा एक भाग असल्याचा आरोप सोमय्या यांनी पंधरवड्यापुर्वी मालेगावी येऊन केला होता. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी महापालिका आणि तहसील कार्यालयात संबंधित प्रक्रिया आणि जन्म-मृत्यू नोंदणीचे नियमन पाहण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला. त्यानंतर, शुक्रवारी (दि. १७) सकाळी ते तहसील कार्यालयात गेले, जिथे त्यांनी जन्म दाखल्यांसाठी प्राप्त अर्ज आणि त्यासोबतची कागदपत्रे तपासली. यावेळी तहसीलदार विशाल सोनवणे यांनी त्यांना नियमानुसारच जन्म दाखले दिले असल्याची माहिती दिली.
यानंतर, सोमय्या यांनी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, तहसीलदार सोनवणे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. पंधरवड्यापुर्वी मालेगावी आल्यावर सुमारे 1106 लोकांना जन्म दाखले महापालिका व तहसील कार्यालयाकडून वितरित झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर एका दिवसातच अर्थात ३१ डिसेंबर रोजी हीच आकडेवारी चार हजारावर कशी गेली, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. सदर दाखले मिळविण्यासाठी घुसखोर बांगलादेशी व रोहिंग्यानी खोटी शपथपत्रे दाखल केली असून त्यांनी सरकारी यंत्रणेची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.
फसवणूक करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी छावणी पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात 100 लोकांची नावे पुराव्यासह पोलिसांना दिली आहे. लवकरच या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर गुन्हा दाखल होइल अशी अशा आहे.
- किरीट सोमय्या, माजी खासदार